“लोकसभा लढवण्यात रस नाही” – अखिलेश यादव

लखनौ – आपल्या पक्षाचे लोकसभा निवडणुकीत पानिपत हो ऊ नये आणि सर्वच मतदारसंघांत प्रत्यक्ष प्रचार करायला बवेळ मिळावा, म्हणून आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांनी जाहीर केले आहे. शिवाय त्यांना उत्तर प्रदेशात विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावायची आहे आणि 2027 च्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात राहायचे आहे.
अखिलेश यादव यांनी मैनपुरीच्या करहलमधून आमदार झाल्यानंतर आझमगड लोकसभा मतदारसंघाचा राजीनामा दिला होता. त्यांनी स्वतः विरोधी पक्षनेतेपद स्वीकारले. काका शिवपाल सोबत आल्यानंतर विरोधी पक्षनेतेपदाबाबत चर्चा सुरू झाल्या, मात्र ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले.
लोकसभा निवडणुका जाहीर होण्याच्या वेळी ते आझमगड किंवा कन्नौजमधून निवडणूक लढवण्याची शक्यता होती, पण आझमगडमधून धर्मेंद्र यादव आणि कन्नौजमधून तेज प्रताप यादव यांना उमेदवार घोषित करून त्यांनी या शक्यतांना पूर्णविराम दिला. मात्र, यामागची रणनीती सांगितली जात आहे.
असे मानले जात आहे की, लोकसभा निवडणूक न लढवून अखिलेश यादव यांनी एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. लोकसभेच्या एका जागेवर स्वत:ला बांधून ठेवण्याऐवजी ते संपूर्ण राज्यात निवडणूक दौरे करू शकतील. दुसरीकडे, ते लोकांमध्ये उपस्थित राहिल्याने विधानसभेवेळी पक्षाची रणनिती आणि उमेदवार ठरवताना त्याचा उपयोग होईल.
विरोधी पक्षनेत्याला कॅबिनेट मंत्र्याचे अनेक अधिकार असतात. राज्याच्या राजकारणातही विरोधी पक्षनेतेपद महत्त्वाचे मानले जाते. तर खासदाराकडे फक्त निधी आणि काही विशेषाधिकार असतात. अखिलेश यादव यांनी कन्नौजमधून तेज प्रताप यादव यांना उमेदवारी देऊन पक्षांतर्गत कोणत्याही प्रकारचा विरोध निर्माण होण्यापासून रोखले आहे.
डिंपल यादव याआधी कन्नौजमधून खासदार होत्या, पण मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर त्यांनी मैनपुरीतून लोकसभा पोटनिवडणूक लढवली होती, तर तेज प्रताप येथून खासदार राहिले आहेत. अशा परिस्थितीत मैनपुरीच्या बदल्यात कन्नौज देऊन त्यांनी कौटुंबिक एकतेचा संदेश दिला आहे.
तेज प्रताप हे राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे जावई असून सपाविरोधात बंड करणाऱ्या हरिओम यांचे नातूही आहेत. मैनपुरीमधून डिंपल यादव, बदायूंमधून आदित्य यादव, फिरोजाबादमधून अक्षय यादव, आझमगडमधून धर्मेंद्र यादव यांना आधीच उमेदवार घोषित करण्यात आले आहे. या जागांवर बाहेरच्या कुटुंबातील उमेदवार उभा केल्यास संघर्ष होण्याची भीती होती.





