मुख्यमंत्री बनण्यात रस नाही ! ज्योतिरादित्य शिंदे

उज्जैन – मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नक्कीच नाही. मी भाजपचा सेवक आहे. पक्षाच्या हितासाठी नेतृत्व जो काही निर्णय घेईल, ते मी मनापासून पाळेन, असे प्रतिपादन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केले आहे.
मध्य प्रदेशातील सर्व 230 विधानसभा जागांसाठी 17 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. यावेळी भाजप कोणत्याही मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणूक लढवत आहे.
तर कॉंग्रेसकडून माजी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष कमलनाथ निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना कॉंग्रेसचा मुख्यमंत्री चेहरा मानले जात आहे.
येथे भाजपचा विजय झाला तर कदाचित शिवराजसिंह चौहान यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्याला विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच अनेक दिग्गज नेत्यांची नावेही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सामील झाली आहेत. यापैकी एक नाव शिंदे यांचे आहे.
पक्षाने तुम्हाला मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली तर तुम्ही काय कराल? यावर उत्तर शिंदे म्हणाले, हाच प्रश्न 2013 मध्ये विचारण्यात आला होता. 2018 मध्येही हाच प्रश्न विचारण्यात आला होता.
आता 10 वर्षांनंतर ते मला पुन्हा विचारत आहेत. तेव्हाही मी असे म्हटले होते. मी या शर्यतीत लढत नाही. मी खासदार आहे, जनतेचा सेवक आहे. माझा पक्ष जो काही आदेश देईल, मी त्याचे पालन करीन, पण मी या शर्यतीत नाही.




