‘ब्रिजभूषण यांना अटक करण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत…’; दिल्ली पोलिसांची माहिती

नवी दिल्ली – लैंगिक शोषणाच्या प्रकरणात कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंग यांना अटक करण्याच्या मागणीवरून वातावरण तापले असतानाच त्यांना अटक करण्याकरता आवश्यक असलेले पुरेसे पुरावे आमच्याकडे नसल्याचे दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे पैलवानांच्या मागणीवरून ब्रिजभूषण यांना आता लगेचच अटक होण्याची शक्यता नसल्याचे सूचित होते आहे.
आमच्याकडे अजुनतरी अटकेसाठी आवश्यक असलेले सबळ पुरावे नाही.
येत्या पंधरा दिवसांत आम्ही या संदर्भातील आमचा अहवाल न्यायालयात सादर करणार असल्याचे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. आमचा हा अहवालच अंतिम आरोपपत्र असू शकतो. तथापि, पैलवानांकडून जे काही दावे केले गेले आहेत त्याची पुष्टी करणारे पुरावे आमच्या हाती लागलेले नाहीत.
एफआयआरमध्ये दाखल केल्या गेलेल्या पोक्सो कायद्यातील तरतुदीनुसार या गुन्ह्यात सात वर्षांपेक्षा कमी कालावधीची शिक्षा होऊ शकते. त्यामुळेच अटकेची मागणी केली जात असली तरी पोलीस तसे पाउल अद्याप उचलत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आरोपी पुरावे नष्ट करण्याचा अथवा कोणावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे अदयाप आढळून आले नसल्याची माहितीही सूत्रांनी दिली.





