उत्तर कोरियाही लावणार सीमाभागात लाऊडस्पीकर

सेऊल – उत्तर कोरिया देखील सीमाभागात तसेच लाऊड स्पीकर उभे करत असल्याची चिन्हे असल्याचे दक्षिण कोरियाच्या लष्कराने सोमवारी सांगितले. दक्षिण कोरियाने सीमाभागात लाऊडस्पीकर लावल्यानंतर आता उत्तर कोरियानेही तशीच कृती करून प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे.
यामुळे दोन्ही कोरिया दरम्यानच्या शीतयुद्धातील मानसशास्त्रीय रणनिती खेळल्या जाऊ लागल्या आहेत. उत्तर कोरियातून घाणीने भरलेले तब्बल १ हजार बलून पाठवले गेल्यामुळे दक्षिण कोरियाने सीमेवर लाऊड स्पीकर लावून उत्तर कोरियाविरोधी कार्यक्रमांचे प्रसारण करण्याचा निर्णय जाहीर केला.
तर बलून पाठवण्याची आपली कृती ही दक्षिण कोरियाकडून सीमा भागात विमानातून पत्रके टाकली जाण्याला प्रत्युत्तर होते, असे उत्तर कोरियानं म्हटले आहे. उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांच्या एकाधिकारशाहीला आव्हान देणे हा उत्तर कोरियामध्ये अत्यंत संवेदनशील गुन्हा मानले जाते आहे. त्यांच्या विरोधात प्रचार करणारी पत्रके विमानातून टाकणे सहन केले जाऊ शकणार नाही, असे उत्तर कोरियाने म्हटले आहे.
सीमाभागगात उत्तर कोरियाकडून किती आणि कोठे लाऊड स्पीकर लावले जात आहेत, याचा तपशील दक्षिण कोरियाकडून मिळू शकलेला नाही. हे स्पीकर अजून तरी सुरू झालेले नाहीत.
मात्र दक्षिण कोरियाने आपले लाऊड स्पीकर कालपासून सुरू केले आणि त्यावरून उत्तरकोरियावर टीका करणाऱ्या कार्यक्रमांचे आणि दक्षिण कोरियातील पॉप संगीताचे प्रसारण सुरू देखील केले आहे.
किम यांच्या भगिनीने दिली धमकी
दक्षिण कोरियाच्या लाऊड स्पीकरवर किम जोंग उन यांच्या भगिनी किम ओंग जुंग यांनी जोरदार टीका केली आहे. दक्षिण कोरिया धोकादायक खेळ खेळत आहे. लाऊड स्पीकर आणि विमानातून पत्रके टाकणे बंद झाले नाही, तर दक्षिण कोरियाला कल्पना करता येणार नाही, अशा परिणामांना सामोरे जावे लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.





