‘सडेतोड उत्तर दिले जाईल…’, किम जोंग उनच्या बहिणीची अमेरिकेला उघड धमकी

North Korea-USA | अमेरिका आणि उत्तर कोरियामधील तणाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. उत्तर कोरियाचे प्रमुख किंम जोंग उन यांच्या बहिणीने अमेरिकेला उघडपणे धमकी दिली आहे. किंम जोंग उन यांच्या बहिण किम यो जोंग यांनी अमेरिकेला धमकी देत सडेतोड उत्तर दिले जाईल, असा इशाराच दिला आहे.
दक्षिण कोरियामध्ये अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौका आणि इतर लष्करी हालचाली वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर किम यो जोंग यांनी अमेरिकेला प्रत्युत्तरात्मक कारवाईची धमकी दिली आहे. तसेच, अमेरिका व त्यांच्या मित्र राष्ट्रांकडून संघर्षपूर्ण पाऊल उचलले जात असल्याचे म्हटले आहे.
उत्तर कोरियाकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र चाचणी केली जात आहे. तर अमेरिकेने याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमधील राजनैतिक संवाद पुन्हा सुरू करण्यासाठी किम जोंग उन यांच्याशी संपर्क साधतील असे म्हटले होते. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात दोन्ही नेत्यांची भेट देखील झाली होती.
रिपोर्टनुसार, एका निवेदनात किम यो जोंग यांनी अमेरिकेवर उत्तर कोरियाबाबत शत्रुत्व आणि संघर्षपूर्ण भूमिका घेतल्याचा आरोप केला आहे. तसेच, कोरियन द्वीपकल्प लष्करी तैनाती कोरियाच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका यूएसएस कार्ल विन्सन दक्षिण कोरियाजवळ पोहोचली. त्या पार्श्वभूमीवर आता किम यो जोंग यांनी अमेरिकेवर निशाणा साधला.
रिपोर्टनुसार, उत्तर कोरियाकडून काही दिवसांपूर्वी शस्त्रास्त्र चाचणी करण्यात आली. याच्या प्रत्युत्तरात डोनाल्ड ट्रंप यांनी दक्षिण कोरियामध्ये युद्धनौकांचा ताफा पाठवला आहे. ट्रम्प सरकारकडून कडून उत्तर कोरियाविरोधात कठोर पावले उचलत आहे. सध्या अमेरिकेचे 28 हजारांहून अधिक सैनिक दक्षिण कोरियात तैनात आहेत.





