मुंबई – बॉलीवूडची दिलबर गर्ल म्हणजेच अभिनेत्री नोरा फतेहीने बॉलीवूडमध्ये स्वतःचे असे एक वेगळं स्थान मिळवले आहे. नोरा फतेहीच्या चाहत्यांची यादी खूप मोठी आहे. याच कारणामुळे अभिनेत्रीच्या इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सचीही मोठी यादी असल्याचं पाहायला मिळत आहे. डान्सिंग दिवा नोरा फतेही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असून सर्वच जण अभिनेत्रीच्या डान्सचे दिवाने झाले आहेत. लवकरच ती ‘हिप हॉप इंडिया’ या टीव्ही शोवर झळकणार आहे. नोरा ही या शोमध्ये परीक्षक म्हणून दिसणार असून प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा हा सहपरीक्षक असणार आहे. हे दोघे मिळून भारतातील सर्वोत्कृष्ट हिप हॉप डान्सर निवडणार आहेत. हे दोघेही एकत्र परीक्षक म्हणून यात दिसणार असल्याने चाहते आनंदी झाले आहेत. नुकतेच नोरा फतेहीचे पोस्टर प्रसिद्ध करण्यात आले आहे. यासोबतच हा अॅमेझॉन मिनी टीव्हीने हा शो 21 जुलै रोजी प्रीमियर करण्यात येणार असल्याचेही जाहीर केले आहे. या शोच्या माध्यमातून सर्व स्तरातील कलाकारांना संधी मिळणार आहे. या शोबाबत नोरा फतेही म्हणाली की, “हिप हॉप हा खूप छान आणि मजेशीर नृत्य प्रकार आहे. अमेझॉन मिनी टीव्हीच्या या शोमध्ये परीक्षक बनणं, सहपरीक्षक आणि माझा मित्र रेमो डिसूजा सोबत प्रतिभावंत हिपहॉप डान्सरचे डान्स पाहणं आणि त्यातून सर्वोत्तम हिप हॉप डान्सरची निवड करणे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आम्ही या शो साठी सज्ज आहोत तुम्हीही तयार व्हा.” दरम्यान, नोरा तिच्या धमाकेदार डान्स मूव्हसाठी ओळखली जाते. ‘साकी-साकी’, ‘कमरिया’, ‘गर्मी’, ‘दिलबर-दिलबर’ ही नोराची सर्वोत्तम नृत्य गाणी आहेत.नोराने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. या यादीत ‘स्ट्रीट डान्सर 3डी’, ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ आणि ‘बाटला हाउस’ सारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे. तर रेमो डिसूजाच्या कोरिओग्राफीची जादू याआधी ‘ABCD’, ‘स्ट्रीट डान्सर’, ‘ये जवानी है दिवानी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली आहे. त्याने अनेक डान्स शोजही जज केले आहेत.