Nora Fatehi: नोरा फतेही अडचणीत; वर्क परमिट रद्द करून देशाबाहेर पाठवण्याची मागणी!
Nora Fatehi हे गाणे केडी डेव्हिल या चित्रपटातील असून त्याच्या हिंदी व्हर्जनमधील बोलांवर आक्षेप घेतला जात आहे. अनेकांनी हे गाणे अश्लील आणि महिलांचा अपमान करणारे असल्याचे म्हटले आहे. या वादामुळे केंद्र सरकारने हे गाणे बॅनही केले आहे.

Nora Fatehi: बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही सध्या मोठ्या वादात अडकली आहे. ‘सरके चुनर तेरी सरके’ या गाण्यामुळे तिच्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, आता तिचे वर्क परमिट रद्द करून भारतातून डिपोर्ट करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
हे गाणे केडी डेव्हिल या चित्रपटातील असून त्याच्या हिंदी व्हर्जनमधील बोलांवर आक्षेप घेतला जात आहे. अनेकांनी हे गाणे अश्लील आणि महिलांचा अपमान करणारे असल्याचे म्हटले आहे. या वादामुळे केंद्र सरकारने हे गाणे बॅनही केले आहे.
माध्यमांतील माहितीनुसार, सुमारे १० वकिलांच्या टीमने गृह मंत्रालयाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांनी नोरा फतेहीचे वर्क परमिट रद्द करून तिला देशाबाहेर पाठवण्याची मागणी केली आहे. या तक्रारीत त्यांनी विदेशी अधिनियम १९४६ आणि पासपोर्ट अधिनियम १९२० यांचा उल्लेख करत सरकारला कारवाई करण्याचा अधिकार असल्याचे सांगितले आहे.
या प्रकरणात फक्त गृह मंत्रालयच नव्हे, तर माहिती आणि प्रसारण मंत्रालय, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) आणि राष्ट्रीय महिला आयोग यांच्याकडेही तक्रारी करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या गाण्यात दिसणारे इतर कलाकार, जसे की संजय दत्त यांच्याबाबत तितकीशी चर्चा होत नाही, मात्र नोरा फतेहीवरच जास्त टीका होत असल्याचे दिसते.

Nora Fatehi
वकिलांच्या याचिकेत या गाण्याला “अत्यंत अश्लील” असे म्हटले असून, ते सार्वजनिक नैतिकतेला धक्का देणारे आणि महिलांच्या सन्मानाला बाधा आणणारे असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, नोरा फतेहीने अशा कंटेंटमध्ये काम करून भारतात काम करण्याच्या संधीचा गैरवापर केल्याचेही म्हटले आहे.
याचिकेत भारतीय न्याय संहिता, महिलांचे अश्लील चित्रण प्रतिबंधक कायदा १९८६ आणि माहिती तंत्रज्ञान कायदा २००० यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. वकिलांनी असा दावा केला आहे की, अशा प्रकारचे गाणे समाजात चुकीचा संदेश देतात आणि महिलांना वस्तूसारखे दाखवतात.
दरम्यान, या सर्व आरोपांवर नोरा फतेहीने स्पष्टीकरण दिले आहे. तिने सांगितले की, हे गाणे तिने तीन वर्षांपूर्वी कन्नड भाषेत शूट केले होते आणि त्यावेळी त्यातील शब्दांचा अर्थ तिला पूर्णपणे माहित नव्हता. नंतर हे गाणे हिंदीमध्ये डब करण्यात आले, पण त्यासाठी तिची परवानगी घेण्यात आली नाही, असा दावा तिने केला.
तिने असेही सांगितले की, गाण्याच्या हिंदी व्हर्जनमध्ये काही बदल करण्यात आले, जे तिला योग्य वाटले नाहीत. त्यामुळे तिने या प्रोजेक्टपासून स्वतःला दूर ठेवले आणि त्याचे प्रमोशनही केले नाही. तसेच, गाण्याच्या लाँचदरम्यान एआयच्या मदतीने तयार केलेल्या काही फोटोंवरही तिने नाराजी व्यक्त केली.
मात्र, वकिलांनी तिचे स्पष्टीकरण नाकारत ते “नंतर केलेले समर्थन” असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणामुळे आता मोठा वाद निर्माण झाला असून, पुढे काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





