कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर अटकेची टांगती तलवार, POCSO प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी

karnataka news –‘प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स’ (POCSO) कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या अडचणीत वाढ होत आहे. बेंगळुरूच्या एका न्यायालयाने गुरुवारी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरुद्ध POCSO प्रकरणात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. (non bailable arrest warrant against former karnataka chief minister yediyurappa in a pocso case)
दरम्यान, कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी बुधवारी सांगितले होते की, येडियुरप्पा यांच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत खटल्याचा तपास करत असलेल्या गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे आणि गरज पडल्यास त्यांना अटक देखील केली जाऊ शकते.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय मुलीच्या आईच्या तक्रारीच्या आधारे येडियुरप्पा यांच्याविरुद्ध पोक्सो आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 354 ए (लैंगिक छळ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीत महिलेने आरोप केला आहे की, यावर्षी 2 फेब्रुवारी रोजी येडियुरप्पा यांनी डॉलर कॉलनीतील त्यांच्या निवासस्थानी एका बैठकीदरम्यान तक्रारदार महिलेच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले.
14 मार्च रोजी, सदाशिवनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर, कर्नाटकचे पोलिस महासंचालक आलोक मोहन यांनी तत्काळ प्रभावाने प्रकरण तपासासाठी सीआयडीकडे सोपवण्याचे आदेश जारी केले. येडियुरप्पा यांच्यावर आरोप करणाऱ्या 54 वर्षीय महिलेचे गेल्या महिन्यात येथील एका खासगी रुग्णालयात फुफ्फुसाच्या कर्करोगाने निधन झाले. येडियुरप्पा (81) यांनी आरोप फेटाळून लावले असून, ते कायदेशीररित्या लढणार असल्याचे सांगितले. त्यांनी न्यायालयाला एफआयआर रद्द करण्याची विनंती केली आहे.





