पिंपरी | सुनील शेळके यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

पिंपरी, (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तथा महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी गुरुवारी (दि. २४ ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी वडगाव मावळ शहरात सुनील शेळके यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. हजारो शेळके समर्थकांचा मेळा जणू वडगाव मावळ शहरात जमला होता. त्यानंतर प्रमुख चार सहकाऱ्यांच्या उपस्थितीत सुनील शेळके यांनी त्यांचा मावळ विधानसभा मतदारसंघ साठीचा उमेदवारी अर्ज दाखल केला.
मावळ विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी शेळके यांचे नामनिर्देशन पत्र स्विकारले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विक्रम देशमुख हेही उपस्थित होते. सुनील शेळके हे उमेदवारी अर्ज भरत असताना त्यांच्या सोबत ज्येष्ठ नेते माऊलीभाऊ दाभाडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे आणि पक्षाचे एक ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
सभेत विरोधकांवर डागली तोफ
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पंचायत समिती चौक वडगाव मावळ येथे जमलेल्या विराट जनसमुदायाला आमदार शेळके यांनी संबोधित केले. आपल्या विरोधात उभे असलेले उमेदवार यांच्याकडे प्रचारासाठी विकासाचा मुद्दा नसून फक्त सुनील शेळकेला विरोध म्हणून सर्वजण एकत्र येत असल्याचा आरोप शेळकेंनी केला.
तसेच आपल्या विरोधात जो कोणी उमेदवार असेल त्याला ५० कोटी मिळणार असल्याचाही गंभीर आरोप शेळकेंनी केला. यासोबत उपस्थित समर्थकांकडून सुनील शेळके यांनी दुसऱ्यांदा संधी देण्याची मागणी केली.
निवडणूक कार्यालयाकडून १६ उमेदवारांना अर्जांची विक्री –
निवडणूक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, २०४ मावळ विधानसभा मतदारसंघ करिता गुरुवारी, दिनांक २४ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत ३ उमेदवारांना ६ नामनिर्देशन पत्राची विक्री करण्यात आली.
त्यासह गुरुवार अखेरीस एकूण १६ उमेदवारांना ३३ अर्जांची विक्री करण्यात आली आहे. तसेच दिनांक २४ ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन सादर /प्राप्त झालेली उमेदवार संख्या २ असून नामनिर्दशन पत्र दाखल संख्या (एकूण) ३ आहे. उद्या नामनिर्देश सादर करण्याचा चौथा दिवस आहे.





