पाणी नाही तर मतदानही नाही

वाकडमधील उच्चभ्रू सोसायटीमधील रहिवाशांचा इशारा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील ऐन पावसाळ्यात पाणी समस्या दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. पाणी टंचाईने हैराण झालेल्या वाकड येथील अटालांटा या सोसायटीतील रहिवाशांनी थेट मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचा फलकच रहिवाशांनी सोसायटीसमोर लावल्याने हा विषय चांगलाच चर्चेचा आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही सोसायटी सत्ताधारी असलेल्या एका राजकीय वजनदार नेत्याने बांधली असल्याचे सांगण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण यावर्षी तब्बल तीन वेळा शंभर टक्के भरले. मात्र सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष आणि प्रशासनाची मनमानी यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून शहरवासियांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. वारंवार मागणी करूनही पाणीपुरवठ्यातील अडथळे दूर करण्यात प्रशासनाला यश आले नाही. सत्ताधारी नगरसेवकांवर उपोषण करण्याची वेळ आली, पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप केला यानंतरही पाणी समस्येचा प्रश्न “जैसे थे’ आहे. अनियमित पाणीपुरवठ्याचा फटका सोसायट्यांना सर्वाधिक बसत आहे. कमी दाबाचा आणि कमी वेळ पाणीपुरवठा होत असल्याने ऐन पावसाळ्यात टॅंकरने पाणी मागविण्याची वेळ शहरातील शेकडो सोसायट्यांवर आली आहे.
पाणीपुरवठ्याच्या तीव्र टंचाईला आता वाकड येथील अटलांटा सोसायटीमधील रहिवाशांनी तोंड फोडले आहे. या सोसायटीतील रहिवाशांनी सोसायटीसमोर भला मोठा फलक लावला असून, “पाणी नाही तर मतदानही नाही’, असा आशय या फलकावर छापण्यात आला आहे. “या सोसायटीत आम्ही एक हजार रहिवाशी रहात असून, आम्ही महापालिकेचे सर्व कर प्रामाणिकपणे भरत आहोत. मात्र ऐन पावसाळ्यात आम्हाला दरमहा टॅंकरद्वारे पाणी मागविण्यासाठी तीन लाख रुपये खर्च करावे लागत आहेत’ असा आशयही या फलकावर लिहिण्यात आला आहे. सोसायटीने घेतलेल्या या भूमिकेमुळे पाण्याची समस्या आणखीनच तीव्रतेने समोर आली आहे. पालिका प्रशासन आणि सत्ताधारी असलेल्या भाजपा नेत्यांना आता तरी जाग येणार का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित
केला आहे.
राजकीय व्यक्तीचे बांधकाम
वाकड येथे उभारण्यात आलेली ही सोसायटी सत्ताधारी पक्षातील एका वजनदान व्यक्तीची असल्याचे सांगितले जात आहे. पालिकेची सत्ता हातात असतानाही या सोसायटीतील पाणीपुरवठ्याची समस्या रोखण्यात संबंधितांना यश आले नाही. येत्या विधानसभा निवडणुकीत ही सोसायटी आपली भूमिका कायम ठेवणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.





