NEET Re-Exam : नीट फेरपरीक्षेबाबत जोखीम नकोच.! सुरक्षा, सतर्कतेला देणार प्राधान्य
२१ जून रोजीच असलेल्या जागतिक योग दिन आणि नीट-युजी फेरपरीक्षा यांच्यासाठीची सुरक्षा व्यवस्था स्वतंत्र ठेवणे.

NEET Re-Exam : वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीट-युजी प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणामुळे टीकेचा सामना केल्यानंतर, नॅशनल टेस्टिंग एजन्सी आता २१ जून रोजी होणारी फेरपरीक्षा अत्यंत निर्दोषपणे पार पाडण्यासाठी कोणतीही जोखीम न घेण्याच्या मनस्थितीत असल्याचे दिसते.
एजन्सीचे अधिकारी प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांच्याशी स्वतंत्र बैठका घेत आहेत. २१ जून रोजीच असलेल्या जागतिक योग दिन आणि नीट-युजी फेरपरीक्षा यांच्यासाठीची सुरक्षा व्यवस्था स्वतंत्र ठेवणे.
योग दिनाच्या कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल तैनात केले जाणार नाही, याची विशेष काळजी घेतली जात आहे. प्रत्येक राज्यातील या कार्यक्रमात व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी सहभागी होतात. त्यामुळेच आम्ही स्वतंत्र सुरक्षा तुकड्यांची मागणी करत आहोत.
तसेच, ५५१ शहरांमधील परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका वेळेवर आणि सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी विशिष्ट मार्ग निश्चित करण्यावरही अधिकारी भर देत आहेत. राज्यांमधील व्हीआयपींच्या हालचालींमुळे यात कोणताही अडथळा किंवा संघर्ष निर्माण होऊ नये, असेही सरकारला वाटते.
पश्चिम आशियात असलेल्या परदेशातील १४ केंद्रांवर सुमारे ५,००० उमेदवारांसाठी फेरपरीक्षा सुरक्षितपणे पार पाडली जाईल, याचीही काळजी घेतली जात आहे.
बैठकांचे सत्र सुरुच !
शनिवारी उशीरापर्यंत अधिकाऱ्यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि जिल्हा दंडाधिकारी यांच्याशी चर्चा केली. बिहार, झारखंड, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, छत्तीसगड, राजस्थान, आसाम, ओडिशा आणि तेलंगणा या राज्यांच्या मुख्य सचिवांसोबतच्या बैठका आधीच पूर्ण झाल्या आहेत. तामिळनाडू आणि केरळच्या अधिकाऱ्यांसोबतच्या बैठका पुढील आठवड्यात होणार आहेत.





