पंजाबमध्ये कुणालाच स्पष्ट बहुमत मिळणार नाही : अमरिंदर सिंग

पतियाळा – पंजाबमधील यावेळची निवडणूक राजकीय पक्षांच्या दृष्टीने अवघड लढत ठरणार आहे. कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असा दावा माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी सोमवारी केला.
पंजाब विधानसभा निवडणुकीला बहुरंगी लढतीचे स्वरूप आले आहे. त्यामुळे मतदारांना निवड करणे सोपे जाईल. मात्र, या लढतीत सरस कामगिरी करण्याचे मोठे आव्हान राजकीय पक्षांपुढे आहे. बरेच राजकीय पक्ष 10 किंवा 15 जागांचा पल्ला पार करू शकणार नाहीत, असे भाकीत अमरिंदर यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीवेळी केले.
पंजाबमध्ये विधानसभेच्या एकूण 117 जागा आहेत. त्या राज्यात 20 फेब्रुवारीला मतदान होईल. पंजाबमध्ये प्रामुख्याने कॉंग्रेस आणि आपमध्ये लढत होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अमरिंदर यांच्या नव्या पक्षाने (पंजाब लोक कॉंग्रेस) भाजप आणि एसएडी(संयुक्त) या पक्षांशी आघाडी केली आहे. तर, शिरोमणी अकाली दल आणि बसपमध्ये युती झाली आहे. त्याशिवाय, शेतकरी संघटनांची आघाडीही निवडणूक रिंगणात उतरली आहे.





