Chitra wagh vs Urfi Javed : आयोगाने काय करावं हे कोणी सांगायची गरज नाही – रूपाली चाकणकर

मुंबई – राज्य महिला आयोगाकडे आत्तापर्यंत 10 हजार 907 तक्रारी आल्या. त्यापैकी 9 हजार 520 तक्रारी आम्ही निकाली काढल्या आहेत. त्यामुळं राज्य महिला आयोग व्यापक स्वरूपात काम करत आहे. तेंव्हा आयोगाने काय करावं हे कोणी सांगायची गरज नाही. असं प्रत्युत्तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच नाव न घेता दिले.
त्या पुढे म्हणाल्या की, तुम्ही ज्या व्यक्तीबाबत मला विचारात आहात, त्यांना महिलांवर अन्याय झालं की वेदना होतात. त्या मंगेश मोहिते, राहुल शेवाळे आणि श्रीकांत देशमुख यांनी महिलांवर केलेल्या अन्यायाकडे ही लक्ष घालतील आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून त्या पीडित महिलांना न्याय मिळवून देतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कोणी काय कपडे परिधान करावेत हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. एखादा पेहराव ठराविक व्यक्तींना अश्लील वाटत असेल पण इतरांना तो अश्लील वाटत नसतो. त्यामुळं आयोग अशा बाबतीत वेळ वाया घालवू शकत नाही, असं देखील चाकणकर म्हणाल्या.
प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे. म्हणूनच शेवटी कोणी काय कपडे घालावेत हा ज्याचं त्यानं ठरवायला हवं. त्यातून ही कोणी काय कपडे घातले याचा इतिहास काढला तर फार मोठी यादी समोर येईल. त्यावर त्यांना ही उत्तरं द्यावी लागतील. तेंव्हा कपडे परिधान करण्याचं स्वातंत्र्य द्यायला हवं, असं देखील त्या म्हणाल्या.
दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यात ट्विटरवॉर सुरु आहे. एकमेकींकडून आरोप-प्रत्यारोप होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच चित्रा वाघ या उर्फी जावेदच्या विरोधात पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहेत.
“उर्फी जावेदच्या उघडंनागडं फिरण्याला महिला आयोगाचं समर्थन आहे का?”; चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल
यावेळी त्यांनी उर्फी जावेदवरुन थेट राज्य महिला आयोगालाच सवाल केला आहे. उर्फी जावेदच्या उघडंनागडं फिरण्याला महिला आयोगाचं समर्थन आहे का? असा संतप्त प्रश्न त्यांनी विचारला होता.





