Satara | ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांचा ना. महेश शिंदे गटात प्रवेश

कोरेगाव (प्रतिनिधी) – तब्बल १५ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांचे एकनिष्ठ कट्टर समर्थक म्हणून संपूर्ण विधानसभा मतदारसंघात ओळख असलेले कोरेगाव तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष बीसी,
ओबीसी सेलचे अध्यक्ष किशोर काशीद व कार्याध्यक्ष रमेश पवार यांनी अखेर त्यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. सोमवारी खटाव येथील निवासस्थानी दोघांनी ना. महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.
आ. शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना बीसी आणि ओबीसी समाजाचे प्रश्न प्राधान्य क्रमाने सुटले नाहीत. समाज बांधवांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आमदार शिंदे यांनी अपेक्षित काम केले नाही. केवळ निवडणुका आल्यानंतर समाज दिसत होता.
प्रत्येक निवडणुकीत समाजाची आठवण यायची, मात्र निवडणूक उलटून गेल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. संत सेना महाराज मंदिर आणि समाज मंदिर बांधण्यापलिकडे या समाजाच्या हिताकडे लक्ष दिले नसल्याने किशोर काशीद व रमेश पवार हे नाराज होते.
कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना. महेश शिंदे यांचे काम अत्यंत चांगले आहे. सर्व समाज बांधवांना बरोबर घेऊन ते चालत आहेत.
मतदारसंघातील आणि बीसी ओबीसी सेलमधील प्रत्येक कार्यकर्त्यांचे मत जाणून घेऊन आणि त्याच्याशी मनमोकळेपणाने चर्चा केल्यानंतर ना. महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत बीसी ओबीसी समाजाची ताकद ना. महेश शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभी करणार असल्याचे किशोर काशीद यांनी सांगितले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे सर्वधर्मसमभाव ही भूमिका कायम आहे. मतदारसंघातील प्रत्येक समाज बांधव हा आपल्याच कुटुंबातील घटक आहे, हे मानून काम करत आहे. यापुढे किशोर काशीद व रमेश पवार यांच्या नेतृत्वाखाली बीसी ओबीसी समाज संघटना अधिक बळकट करणार असून त्यांना न्याय दिला जाईल, अशी ग्वाही ना. महेश शिंदे यांनी दिली.
यावेळी माजी नगरसेवक सचिनभैय्या बर्गे, नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे, राजेंद्र कुंभार, मदन जगताप, अजित विलासराव बर्गे, बाबा दुबळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व बीसी ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.





