Satara | हिवरे येथील कार्यकर्त्यांचा ना. महेश शिंदे गटात प्रवेश

कोरेगाव, (प्रतिनिधी) – आजवरच्या राजकीय पुढार्यांनी भाडळे खोर्याला केवळ विकासकामांबाबत झुलवत ठेवले. प्रत्येक निवडणुकीत आश्वासने द्यायची आणि निवडणूक झाल्यावर परत फिरकायचे नाही, असे प्रकार होते.
आता मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलून टाकली आहे. विकासकामांबाबत भाडळे खोरे आता परिपूर्ण झाले असून, आता पाणी प्रश्न नजिकच्या काळात सोडविणार आहे, अशी ग्वाही कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना. महेश शिंदे यांनी दिली.
भाडळे खोर्यातील महत्वपूर्ण अशा हिवरे येथील पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी ना. महेश शिंदे यांच्या कार्याने प्रभावीत होऊन ना. महेश शिंदे गटात शनिवारी खटाव येथील निवासस्थानी प्रवेश केला.
भगवी शाल देऊन ना. महेश शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. प्रत्येक कार्यकर्त्याला राजकीय ताकद दिली जाईल, विकासकामांबाबत कधीही दुजाभाव केला नाही आणि करणार देखील नाही. हिवरे परिसराचे नंदनवन करण्याचे स्वप्न पाहिले होते, आज ते प्रत्यक्षात उतरले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
माजी सरपंच अजित खताळ व विद्यमान सरपंच सुरेखा खताळ यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत सदस्या काजल सुदीश कांबळे, हिवरे विकास सोसायटीचे संचालक सुदीश उत्तम कांबळे, नितीन कांबळे, विलेश कांबळे, रविकांत कांबळे यांनी ना. महेश शिंदे गटात प्रवेश केला. त्यांचे ना. महेश शिंदे यांनी स्वागत केले.
यावेळी माजी सरपंच अजित खताळ, विद्यमान सरपंच सुरेखा खताळ, माजी सरपंच सतीश कांबळे, उपसरपंच वैभव खताळ, ग्रामपंचायत सदस्य समाधान शिंदे, नितीन खताळ, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तानाजी बिडे, रमेश कांबळे, रवींद्र कांबळे, अनिल कांबळे, शेखर कांबळे, स्वाती कांबळे, माजी सरपंच सुनील खताळ, माजी उपसरपंच सुधीर खताळ, पंढरीनाथ खताळ, सोमनाथ तांबे, नारायण खताळ यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
हिवरे गाव विकासाच्या शिखरावर पोहोचणार : ना. महेश शिंदे
भाडळे परिसरातील रस्त्यांचे प्रश्न सुटले आहेत. गुरुवर्य कै. लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजनेतून भाडळे परिसरातील प्रत्येक गावात पाणी दिले जाणार आहे. भाडळे तलावातून पाणी उचलून नलवडेवाडीत नेले जाणार आहे,
तेथून बिचुकले आणि तळियेचे तलाव भरणार असून, दुष्काळी भागातील पाणी प्रश्न सुटणार आहे. बौद्ध वस्ती कडे जाणाऱ्या पिराचा मळा ओढा व नरशाचा ओढा या ठिकाणी साकव पूल बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार आहे असेही ना. महेश शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले.





