Ajit Pawar : अजित पवारांचे नाव देण्याअगोदर कुटुंबाकडून ना-हरकत प्रमाणपत्र बंधनकारक! ‘या’ अटी व नियमांची पूर्तता करावी लागणार
Ajit Pawar : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव संस्था, ट्रस्ट फाउंडेशनला देण्याअगोदर किंवा त्यांचा पुतळा स्मारकांना नाव देण्यासाठी त्यांच्या कुटुंबाकडून ना-हरकत घ्यावी लागणार आहे.

Ajit Pawar : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर महाराष्ट्रावर मोठा आघात झाला. ही हानी कधीही न भरुन निघणारी आहे. अजितदादांविषयी जनमानसांत आदराची भावना आहे. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यांचे नाव संस्था, फाउंडेशनला देण्याअगोदर काही अटींची पूर्तता करणे बंधनकारक असणार आहे.
अजित पवार यांचे नाव संस्था, ट्रस्ट फाउंडेशन किंवा पुतळे व स्मारके उभारण्यासाठी लावण्याअगोदर त्यांच्या कुटुंबीयांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. याबाबत नुकतेच एक प्रसिद्धीपत्रक धर्मादाय आयुक्त कार्यालय वरळी येथे प्रसिद्ध करण्यात आले आहे.
अजित पवार यांचे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदान मोठे आहे. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी अनेक जण संस्था, ट्रस्ट किंवा स्मारके उभारण्याचा विचार करत आहेत. त्यांच्या नावाचा चुकीचा किंवा व्यावसायिक वापर होण्याची शक्यता असल्याने कुटुंबाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असणार आहे.
तसेच सार्वजनिक ठिकाणी त्यांचे पुतळे किंवा स्मारके उभारण्याबाबत सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयाकडून विशेष कार्यअधिकारी सुनीलकुमार मुसळे यांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयाला पत्र लिहिले आहे. या पत्रात या बाबी नमूद करण्यात आलेल्या आहेत.
पत्रात काय म्हटले आहे?
- दिवंगत अजित दादांच्या नावाने कोणतीही नवीन संस्था, ट्रस्ट किंवा फाउंडेशन नोंदणी करताना कुटुंबीयांची लेखी ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेणे अनिवार्य करावे.
- तसेच सार्वजनिक ठिकाणी त्यांचे पुतळे किंवा स्मारके उभारण्याबाबत सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन व्हावे.
- वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, जागेच्या मालकी हक्काचा प्रश्न उद्भवणार नाही याची दक्षता घेणे.
- अजित पवार यांच्या नावाचा वापर करून अनधिकृत निधी गोळा करणाऱ्या किंवा संशयास्पद कामकाज करणाऱ्या संस्थांची सखोल चौकशी करावी.
- आधीपासून अस्तित्वात असलेल्या संस्थांनी नाव बदलून स्व. अजित दादा पवार यांचे नाव लावण्याचा प्रयत्न केल्यास त्यांनाही हेच नियम लागू करावेत.
या मागण्या धर्मादायक आयुक्तांना पत्र पाठवून करण्यात आल्या होत्या. त्यानुसार आता धर्मादाय आयुक्त कार्यालयाने पत्रक प्रसिद्ध करत नियम व अटी लागू केल्या आहेत.
हेही वाचा : Heatwave Alert : उष्माघात प्रतिबंधासाठी महापालिका आरोग्य विभाग सतर्क






