Heatwave Alert : उष्माघात प्रतिबंधासाठी महापालिका आरोग्य विभाग सतर्क

Heatwave Alert : उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने उष्माघाताच्या संभाव्य घटनांना आळा घालण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
उपसंचालक आरोग्य सेवा, पुणे मंडळ यांनी जारी केलेल्या परिपत्रकाच्या अनुषंगाने शहरातील सर्व शासकीय व महापालिकेच्या आरोग्य संस्थांना उष्माघात प्रतिबंध आणि उपचारासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील रुग्णालये, दवाखाने आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघातग्रस्त रुग्णांसाठी आवश्यक उपचार व्यवस्था उपलब्ध ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी आवश्यक औषधे, आयव्ही फ्लुईड, ओआरएस तसेच इतर वैद्यकीय साहित्याचा पुरेसा साठा ठेवण्यावर भर देण्यात आला आहे.
परिपत्रकानुसार प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उष्माघातग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी ‘कूलिंग रूम’ कार्यान्वित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच उष्माघाताच्या उपचारासंदर्भातील क्लिनिकल मॅनेजमेंट तसेच IHIP–NPCCHH पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया याबाबत वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
उष्माघात नियंत्रणासाठी विविध विभागांमध्ये समन्वय राखण्यासाठी टास्क फोर्स तयार करण्यावरही भर देण्यात आला आहे. यासोबतच नागरिकांमध्ये उष्माघाताबाबत जनजागृती करण्यासाठी प्रिंट आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे आरोग्य संस्थांमध्ये वीज वापर वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व आरोग्य केंद्रांमध्ये इलेक्ट्रिकल ऑडिट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच उष्माघाताशी संबंधित सर्व माहिती आरोग्य विभागाच्या अधिकृत पोर्टलवर नियमितपणे नोंदविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
दरम्यान, उष्णतेच्या तीव्रतेच्या काळात विशेषतः दुपारच्या वेळेत सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन टाळावे तसेच नागरिकांनीही आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात उष्माघाताच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी महापालिका आरोग्य विभागाने ही उपाययोजना सुरू केली आहे.





