Moshi Garbage Depot : ‘मोशी कचरा डेपोत आणखी सात गावांचा कचरा नको’
Moshi Garbage Depot : नगरसेवक निखिल बोऱ्हाडे यांचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन

पिंपरी – मोशी कचरा डेपो येथे आणखी सात गावांचा कचरा आणून टाकण्याच्या प्रस्तावाला मोशी ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. मोशी परिसरावर आधीच कचरा व्यवस्थापनाचा मोठा भार असताना त्यात आणखी भर घालू नये, अशी मागणी नगरसेवक तथा क क्षेत्रीय कार्यालय सभापती निखिल बोऱ्हाडे यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन देऊन सात गावांचा कचरा मोशी येथे टाकण्याची कार्यवाही तात्काळ थांबवून पर्यायी जागा निश्चित करण्याची मागणी केली आहे.
मोशी कचरा डेपो परिसरात यापूर्वीपासूनच शहरातील विविध भागांमधून मोठ्या प्रमाणात कचरा आणला जातो. या परिसरात यापूर्वी गंभीर दुर्घटनाही घडली आहे. त्यामुळे कचरा डेपोच्या सुरक्षिततेचा तसेच परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर आणखी सात गावांचा कचरा मोशी येथे आणणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका बोऱ्हाडे यांनी निवेदनातून मांडली आहे.
सात गावांचा कचरा मोशी येथे टाकण्याची कार्यवाही तात्काळ थांबवून, त्या गावांसाठी मोशीच्या बाहेर स्वतंत्र पर्यायी जागा निश्चित करावी. तसेच पर्यावरणपूरक आणि शास्त्रोक्त कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था उभारावी, अशी भूमिका निखिल बोऱ्हाडे यांनी मांडली आहे.
मोशी परिसरातील नागरिकांचे आरोग्य, पर्यावरण, नदी-नाले, वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील नागरी विकास या सर्व बाबींचा विचार करून प्रशासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने ग्रामस्थांच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास नागरिकांच्या हितासाठी लोकशाही व कायदेशीर मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही नगरसेवक निखिल बोऱ्हाडे यांनी दिला आहे.





