Farooq Abdullah : कितीही वर्षं लागली तरी हरकत नाही कलम 370 पुन्हा लागू करणारच; फारूक अब्दुल्ला यांचा निर्धार

श्रीनगर : राज्यघटनेचे कलम 370 पुन्हा लागू केले जावे अशी जम्मू-काश्मीरच्या जनतेची मागणी आहे. ते कलम आम्ही पुन्हा लागू करणारच. त्यासाठी कितीही वर्षं लागली तरी हरकत नाही, असा निर्धार माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांनी सोमवारी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीमुळे सध्या जम्मू-काश्मीरमधील राजकीय वातावरण तापले आहे. त्या निवडणुकीच्या प्रचारात कलम ३७० हाही महत्वाचा मुद्दा बनला आहे.
नॅशनल कॉन्फरन्सने ते कलम पुन्हा लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्या पक्षावर टीकास्त्र सोडले. भाजप असेपर्यंत ते शक्य नसल्याचे त्यांनी म्हटले. त्यावर अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली. कलम हटवण्यास भाजपला अनेक वर्षं लागली. ते पुन्हा लागू करण्यासाठीही अनेक वर्षं लागू शकतात. पण, ते आम्ही नक्की करू, असे ते बारामुल्लामध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाचे मूळ कारण कलम ३७० असल्याचा दावा भाजपकडून केला जातो. पण, ते कलम हटवल्यानंतरही दहशतवादी हल्ले सुरूच आहेत, अशी टिप्पणी अब्दुल्ला यांनी केली. केंद्र सरकारने ५ वर्षांपूर्वी कलम ३७० हटवले. त्यामुळे जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्दबातल झाला.





