पिंपरी -राज्यात सध्या भारनियमनाची चर्चा सुरू आहे. अद्याप भारनियमनाची अधिकृत घोषणा केली नसली तरी शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये तासन तास वीज पुरवठा खंडित होत असल्याने हे अघोषित भारनियमन आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मंगळवारी नवी सांगवी परिसरात सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित करण्यात आला. यामुळे कामाला जाण्याच्या गडबडीत असलेल्या नागरिकांना घरातच घामाघूम व्हावे लागले. आयटीनगरी अशी ओळख असलेल्या हिंजवडी माण भागातील विविध परिसराचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. काही भागात गेल्या तीन चार दिवसांपासून वारंवार बत्ती गुल होत आहे. एकीकडे भारनियमन नसल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत असतानाच दुसरीकडे ऐन उन्हाळ्यात शहरात विविध ठिकाणच्या खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे व्यावसायिकांचेही नुकसान होत आहे. नवी सांगवी भागात मंगळवारी (दि. 26) सकाळी नऊ ते बारा या वेळेत वीजपुरवठा खंडित झाला होता. तर हिंजवडी, माण व मारूंजी भागात दुपारी साडे बारा वाजता खंडित झालेला वीजपुरवठा दुपारी तीन वाजेपर्यंत सुरळीत झाला नव्हता. चिखली, कुदळवाडी, जाधववाडी, पूर्णानगर, बालघरे वस्ती, पवार वस्ती या परिसरात दुपारी बारा ते अडीच वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित झाला होता. या परिसरातील महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केबल तुटल्याचे कारण सांगितले. अशाच प्रकारे पिंपरी परिसरातही वीज पुरवठा खंडित झाला होता. सर्वच परिसरात कोणते ना कोणते तांत्रिक बिघाडाचे कारण दिले जात असले तरी सातत्याने खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याने नागरिक पुरते त्रस्त झाले आहेत. एकीकडे अव्वाच्या सवा बिले आकारली जात आहेत. दुसरीकडे अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या नावाखालीही बिलापेक्षा अधिक पैसे घेतले जात आहेत. परंतु वीज पुरवठ्यात मात्र सातत्य नाही. महावितरणकडून आश्वासनेच वीज पुरवठ्यातील अनियमिततेमुळे नागरिकांच्या तक्रारींवरून आमदार महेश लांडगे यांनी आतापर्यंत महावितरण अधिकाऱ्यांच्या दोन ते तीन बैठका घेतल्या आहेत. मात्र, या बैठकीदरम्यान झालेल्या चर्चेत महावितरण अधिकाऱ्यांकडून केवळ आश्वासनेच दिली जात असल्याचे अघोषित भारनियमनामुळे दिसत आहे. ——————– उद्योगांना आर्थिक भुर्दंड दीड दोन महिन्यापुर्वी महापारेषणचा ट्रान्सफॉर्मर फेल झाल्याचा सर्वाधिक फटका उद्योगांना बसला होता. आठ तास वीजपुरवठा खंडीत झाल्याने उद्योगांना कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागला. केबलमध्ये बिघाड झाला आहे, केबल जळाली आहे, अशी तांत्रिक बिघाडाची कारणे देत, आठवडाभरात कधीही वीजपुरवठा दोन-तीन तास खंडीत होत असल्याने उद्योगांना महावितरणच्या या अघोषित भारनियमनाचा चांगलाच आर्थिक फटका बसत आहे.