Imran Khan: ‘कोणताही नेता म्हणजे देश नाही’… इमरान खान यांचा Gen Z ला संदेश
Imran Khan इमरान खान यांनी स्पष्टपणे सांगितले की, एखाद्या राजकीय नेत्याची टीका करणे म्हणजे देशाची टीका करणे नव्हे. कोणताही नेता म्हणजे संपूर्ण देश नाही. लोकशाही व्यवस्थेत नागरिकांना प्रश्न विचारण्याचा आणि आपल्या मतांमधून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याचा अधिकार आहे, असे त्यांनी सांगितले.

Imran Khan: अभिनेता इमरान खान सध्या आपल्या कमबॅकसोबतच तरुणांशी केलेल्या संवादामुळे चर्चेत आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित एका चर्चासत्रात त्यांनी देशातील Gen Z अर्थात तरुण पिढीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लोकशाही, राजकीय नेत्यांवरील टीका, नागरिकांचे अधिकार आणि स्वातंत्र्य या विषयांवर आपली भूमिका मांडली.
इमरान खान यांनी स्पष्टपणे सांगितले की, एखाद्या राजकीय नेत्याची टीका करणे म्हणजे देशाची टीका करणे नव्हे. कोणताही नेता म्हणजे संपूर्ण देश नाही. लोकशाही व्यवस्थेत नागरिकांना प्रश्न विचारण्याचा आणि आपल्या मतांमधून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याचा अधिकार आहे, असे त्यांनी सांगितले.
‘नेता म्हणजे देश नाही’
सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या या व्हिडिओमध्ये इमरान म्हणतात की, एखादा नेता हा जनतेने निवडलेला लोकप्रतिनिधी असतो. त्याची जबाबदारी नागरिकांसाठी काम करण्याची असते. त्यामुळे एखाद्या नेत्याच्या निर्णयावर किंवा कामावर प्रश्न उपस्थित करणे म्हणजे देशविरोधी भूमिका घेणे असे समजले जाऊ नये.
ते पुढे म्हणाले की, जे लोक आपल्या प्रश्नांसाठी आवाज उठवतात, ते देखील या देशाचे नागरिक आहेत. त्यामुळे देश म्हणजे केवळ सत्तेत असलेली व्यक्ती किंवा नेता नसून देशातील प्रत्येक नागरिकाचा त्यात समान वाटा आहे.
‘आवाज उठवणे हा नागरिकांचा अधिकार’
इमरान खान यांनी राजकीय नेत्यांना उद्देशूनही महत्त्वाचे भाष्य केले. जनता एखाद्या लोकप्रतिनिधीची निवड एका विशिष्ट जबाबदारीसाठी करते. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी जनतेच्या प्रश्नांना सामोरे जाणे आणि त्यावर उत्तर देणे अपेक्षित आहे, असे त्यांनी म्हटले.
देशभक्ती सिद्ध करण्याच्या मानसिकतेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. एखाद्या व्यक्तीने सरकार किंवा नेत्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला, म्हणून त्याचे देशावरील प्रेम कमी होत नाही, असा त्यांचा मुद्दा होता.

Imran Khan
इमरान यांच्या मते ‘स्वातंत्र्य’ म्हणजे काय?
या चर्चेत इमरान खान यांना स्वातंत्र्याचा अर्थ काय, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्वातंत्र्याचे दोन पैलू सांगितले. त्यांच्या मते, राजकीयदृष्ट्या स्वातंत्र्य म्हणजे असा समाज निर्माण करणे, जिथे प्रत्येक व्यक्तीशी समानतेने वागले जाते.
यासोबतच त्यांनी ‘एकमेकांवर अवलंबून राहणे’ या संकल्पनेचाही उल्लेख केला. आधुनिक समाजात व्यक्तिवादाला मोठे महत्त्व मिळाले आहे. त्यामुळे कुटुंब, मित्र आणि समाजातील परस्परावलंबित्वाचे महत्त्व आपण विसरत चाललो आहोत, असे त्यांनी सांगितले. एकमेकांना आधार देणे आणि सामूहिक भावना जपणे यामुळे आपण एका देशाचा भाग असल्याची जाणीव मजबूत होते, असेही त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनांनाही दिला होता पाठिंबा
यापूर्वी मुंबईतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनातही इमरान खान सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर शांततापूर्ण आणि सभ्य पद्धतीने चर्चा व्हायला हवी, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले होते.
इमरान खान यांच्या या भूमिकांमुळे ते सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. विशेषतः तरुणांना लोकशाहीतील प्रश्न विचारण्याचा अधिकार आणि नागरिक म्हणून त्यांची भूमिका याबाबत त्यांनी केलेले भाष्य लक्षवेधी ठरत आहे.
अभिनय क्षेत्रातही कमबॅकची तयारी
दरम्यान, इमरान खान लवकरच अभिनय क्षेत्रात पुनरागमन करणार आहेत. ‘अधूरे हम अधूरे तुम’ या मॅच्युअर रोमँटिक कॉमेडी चित्रपटाचे शूटिंग त्यांनी पूर्ण केले असून चित्रपट सध्या पोस्ट-प्रॉडक्शनमध्ये असल्याची माहिती आहे. हा चित्रपट यावर्षी थेट ओटीटीवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
‘जाने तू… या जाने ना’पासून लोकप्रिय झालेल्या इमरान खान यांचा शेवटचा प्रमुख भूमिका असलेला चित्रपट ‘कट्टी बट्टी’ होता. त्यामुळे त्यांच्या कमबॅकचीही चाहत्यांना उत्सुकता आहे.





