Vehicle Rules : गाडीचा विमा संपला? पेट्रोल-डिझेल मिळण्यात येणार अडथळा; IRDAIची ANPR यंत्रणेची चाचणी
Vehicle Rules : वाहनाचा वैध विमा नसल्यास पेट्रोल-डिझेल मिळण्यात अडथळा येण्याची शक्यता. IRDAI ‘नो इन्शुरन्स, नो फ्यूल’ पायलट प्रकल्पासाठी ANPR यंत्रणेची चाचणी करणार.

Vehicle Rules : वाहनाचा वैध थर्ड पार्टी विमा नसल्यास पेट्रोल किंवा डिझेल मिळणे कठीण होण्याची शक्यता आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ‘नो इन्शुरन्स, नो फ्यूल’ या प्रस्तावाची अंमलबजावणी तपासण्यासाठी स्वयंचलित नंबर प्लेट ओळख (ANPR) यंत्रणेचा पायलट प्रकल्प राबवण्याच्या तयारीत आहे. निवडक शहरांमध्ये याची चाचणी होण्याची शक्यता आहे.
या व्यवस्थेत वाहनाचा नंबर कॅमेऱ्याद्वारे वाचला जाईल. त्यानंतर विम्याची माहिती विमा माहिती ब्युरो (IIB) आणि ‘वाहन’ (VAHAN) या डेटाबेसमधून तपासली जाऊ शकते. वैध थर्ड पार्टी विमा नसल्यास वाहनाची माहिती संबंधित यंत्रणेला मिळू शकते. अशा वाहनांवर ई-चलानाची कारवाई करण्यासाठीही ही यंत्रणा वापरता येणार आहे.
या प्रकल्पामागे सर्वोच्च न्यायालयाच्या ४ ऑगस्ट २०२६ रोजीच्या निर्देशांची पार्श्वभूमी आहे. न्यायालयाने IRDAI आणि रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाला इंधन विक्रीचा वाहनाच्या वैध विम्याशी संबंध जोडणारा पायलट प्रकल्प तयार करण्यास सांगितले होते. वैध विमा नसल्यास पेट्रोल पंपावर इंधन न देण्याची शक्यता तपासण्याचे निर्देश देण्यात आले होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या नोंदीनुसार, देशातील सुमारे ३०.४८ कोटी नोंदणीकृत वाहनांपैकी सुमारे १६.५४ कोटी वाहने विमाविना असल्याचे आढळले होते. म्हणजेच जवळपास ५६ टक्के वाहनांकडे वैध विमा नव्हता.
मात्र, ही व्यवस्था सध्या देशभर लागू झालेली नाही. पायलट प्रकल्पातून तंत्रज्ञान, डेटामधील अचूक जुळवणी, इंटरनेट जोडणी आणि पेट्रोल पंपावरील अंमलबजावणी यांची चाचणी केली जाणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी सध्या आपल्या वाहनाचा तृतीय-पक्ष विमा वैध आहे की नाही, हे तपासून तो वेळेत नूतनीकरण करणे महत्त्वाचे आहे.





