Fuel shortage : पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधनपुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या अफवांमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांत पेट्रोल-डिझेल खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली असतानाच अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्रात इंधनटंचाई नसल्याचे स्पष्ट केले. नागरिकांनी घाबरून अतिरिक्त इंधनसाठा करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. राज्यात एका दिवसात पेट्रोल आणि डिझेल विक्रीत मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. डिझेल विक्रीत ४२ टक्के, तर पेट्रोल विक्रीत २१ टक्क्यांची वाढ झाली. यामुळे काही ठिकाणी इंधनटंचाईच्या चर्चांना उधाण आले होते. पत्रकारांशी बोलताना भुजबळ म्हणाले, “राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. केंद्र आणि राज्य सरकार अखंडित पुरवठा सुनिश्चित करण्यास सक्षम आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.” (Fuel shortage) Fuel shortage : राज्यातील पेट्रोल-डिझेलबाबत छगन भुजबळ यांची महत्वाची माहिती; म्हणाले – ‘नागरिकांनी…’ अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या माहितीनुसार, मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पेट्रोल विक्रीत २०.३९ टक्के, तर डिझेल विक्रीत १९.६६ टक्के वाढ झाली. विशेषतः १९ मे रोजी डिझेल विक्रीत ४२ टक्के आणि पेट्रोल विक्रीत २१ टक्क्यांची उसळी दिसून आली. (Fuel shortage) या वाढीव मागणीदरम्यानही इंधनपुरवठा सुरळीत राहिला असून सर्व मागणी पूर्ण करण्यात आल्याचे विभागाने स्पष्ट केले. जिल्हानिहाय आकडेवारीनुसार, पेट्रोल विक्रीत वाशीम जिल्ह्यात सर्वाधिक ४२ टक्के वाढ झाली, तर जळगावमध्ये ४० टक्क्यांची वाढ नोंदली गेली. डिझेल विक्रीत अकोल्यात १११ टक्के, वाशीममध्ये १०९ टक्के वाढ झाली. जळगावमध्ये डिझेल विक्री ७२ टक्क्यांनी वाढली असून बीडमध्ये ६३ टक्के आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ४९ टक्क्यांची वाढ झाली आहे. अकोला, बीड, बुलढाणा, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, धाराशिव आणि परभणी या जिल्ह्यांत इंधनविक्री सामान्यपेक्षा अधिक झाल्याचे विभागाने नमूद केले आहे.