राहुल गांधींवर फडणवीसांचा हल्लाबोल: ‘संविधानावर विश्वास नाही, शहरी माओवादी विचारसरणी’

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना ‘शहरी माओवादी’ संबोधले. राहुल गांधी यांनी जनरेशन-झेडला लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार पाडण्याचे आवाहन केल्याचा आरोप फडणवीसांनी केला. गांधी यांना संविधानावर विश्वास नसून ते देशातील सर्व संस्थांचा अवमान करत असल्याचेही त्यांनी म्हटले.
गुरुवारी संध्याकाळी राहुल गांधी यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये निवडणूक आयोगावर टीका करत ‘मत चोरी’चा आरोप पुन्हा केला होता. “देशाचे तरुण, विद्यार्थी आणि जनरेशन-झेड संविधानाचे रक्षण करेल, लोकशाही वाचवेल आणि मत चोरीला विरोध करेल. मी नेहमी त्यांच्यासोबत आहे. जय हिंद!” असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले होते.
VIDEO | Reacting to Congress MP Rahul Gandhi’s ‘Gen-Z’ X post, Maharashtra CM Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) says, “This is not a matter of vote theft, but of Rahul Gandhi losing his mind. He has no faith in the Constitution of our country. He has rejected every system… pic.twitter.com/PMeh5WHcEa
— Press Trust of India (@PTI_News) September 19, 2025
यावर पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता, फडणवीस म्हणाले, “हा मतं चोरीचा प्रश्न नाही, तर राहुल गांधी यांनी आपले मानसिक संतुलन गमावल्याचा पुरावा आहे. त्यांना आपल्या देशाच्या संविधानावर विश्वास नाही. त्यांनी संविधानाने स्थापन केलेल्या प्रत्येक यंत्रणेचा अवमान केला आहे.”
“आज त्यांनी उघडपणे शहरी माओवादी विचारसरणीचा अवलंब करत जनरेशन-झेडला संविधानाने निवडलेले सरकार उलथवण्याचे आवाहन केले आहे. पण आजच्या नव्या भारतातील तरुणाई संविधानावर ठाम विश्वास ठेवते आणि त्याच्या पाठीशी उभी राहील,” असे फडणवीसांनी म्हंटले.





