मावळ : मावळ तालुक्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना ग्रामपंचायतीच्या पाच टक्के निधीचा लाभ मिळावा, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे लेखी निवेदन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कालिदास प्रधान यांना देण्यात आले आहे. संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष व राष्ट्रवादीचे मावळ तालुका संघटन मंत्री नारायण ठाकर, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेल अध्यक्ष सुभाष शेडगे यांनी हे निवेदन सादर केले. यावेळी इंद्रायणी संस्था मावळ अध्यक्ष सतीश ढमाले, मावळ राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे उपाध्यक्ष साजन येवले, राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग महिला सेलच्या अध्यक्षा सारीका ढमाले, सरचिटणीस संदीप लोखरे, तसेच दिव्यांग मित्र बाजीराव ढमाले उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाचे औचित्य साधून हे निवेदन देण्यात आले. त्यात मावळ तालुक्यातील दिव्यांग बांधवांची शासकीय योजनांपासून वंचित राहण्याची समस्या मांडत प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात सर्वेक्षण करून ग्रामसेवकांना सूचना देण्याची विनंती करण्यात आली आहे. सीएसआर फंडाचा वापर करण्याची मागणी निवेदनात स्थानिक कंपन्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी अर्थात सीएसआर फंडाचा उपयोग करून दिव्यांग बांधवांना आवश्यक साधने, उपकरणे आणि सेवा पुरविण्याची मागणीही करण्यात आली. दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा संपूर्ण लाभ मिळावा यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे. स्थानिक कंपन्यांच्या सीएसआर फंडाचा उपयोग केल्यास दिव्यांग बांधवांसाठी उपयुक्त साधनसामग्री उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.