वर्ष लोटले नुकसान भरपाई मिळेना

कोपरगाव – तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे गेल्यावर्षी अतिवृष्टीत आर्थिक नुकसान झाले.शासनाने शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले, मात्र त्याला एक वर्ष उलटला तरीही नुकसान भरपाई मिळत नसल्याने अखेर कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आजपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे, कॉंगेसचे नितीन शिंदे, विजय जाधव, तुषार विद्वांस, मनसेचे अनिल गायकवाड, संतोष गंगावाल, कैलास देवकर, सदाशिव रासकर, नंदू बोरावके, हेमंत गिरमे, नरेंद्र गिरमे यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले.
कृती समितीने निवेदनात म्हटले आहे की, सन 2022 मध्ये तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांची उभी पिके आडवी झाली. त्यात प्रामुख्याने सोयाबीन, मका, कांदा, कपाशी, ऊसासह इतर अनेक फळबागांचे नुकसान होवून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. पावसाने होत्याच नव्हत केले. मायबाप सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचे जाहीर केले. मात्र मदतीच्या हाताकडे शेतकऱ्यांनी डोळे लावून बसले पण वर्ष उलटला तरी नुकसान भरपाई मिळाली नाही. अखेर पाठपुरावा करून वैतागलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी सोमवारी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा पवित्रा घेतल्याने स्थानिक प्रशासन खडबडून कामाला लागले आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार नाही. तोपर्यंत हे उपोषण मागे न घेण्याचा मनोदय या शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
तहसीलदार संदीपकुमार भोसले यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले की,गेल्यावर्षी अति प्रमाणात पाऊस होवून शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.त्यांची नुकसान भरपाई देण्याचे शासनाने जाहीर केले होते. मात्र पुन्हा नव्याने वाढीव नुकसान देण्याची व्यवस्था केल्याने शेतकऱ्यांच्या व शासनाच्या काही तांत्रिक अडचणींमुळे नुकसान भरपाई देण्यास विलंब झाला आहे. सध्या नगर जिल्ह्यासाठी 241 कोटींची नुकसान भरपाई रक्कम आले आहे. येत्या काही दिवसांत तांत्रिक बाबी दुरुस्त करुन संबंधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाणार आहे.
साडेतेवीस कोटी देणे बाकीः तहसीलदार
शासनाने जिराईत क्षेत्रासाठी हेक्टरी 8 हजार 500 रूपये, बागायत क्षेत्रासाठी 17 हजार व बहुवार्षिक पिकांना 22 हजार 500 हेक्टरी नुकसानभरपाई देण्याचे जाहीर केले.त्यानुसार तालुक्यातील 13 हजार 614.42 हेक्टर, जिरायत क्षेत्र 293. 65 हेक्टर व बहुवार्षिकमधील 55.94 हेक्टर क्षेत्रतील 27 हजार 200 नुकसानग्रस्त लाभार्थी असून कोपरगाव तालुक्यात 23 कोटी 52 लाख रुपये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देणे बाकी आहे. आत्तापर्यंत 10 हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात आली असून 7 हजार नुकसानग्रस्त शेतकरी वंचित आहेत, असे तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी सांगितले





