Devendra Fadnavis : “गडचिरोलीत माझ्या एवढा फिरलेला मुख्यमंत्री नाही” – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागांचा दौरा केला. नक्षलवादाने प्रभावित असलेला जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख होती. मात्र आता या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात परिवर्तन दिसून येत आहे. या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद फडणवीसांकडे आहे. शुक्रवारी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील काही भागांचा दौरा केला. यावेळी त्यांनी गडचिरोलीत माझ्या एवढा फिरलेला मुख्यमंत्री दुसरा कोणीच नाही, असा दावा देखील केला.
गडचिरोलीमध्ये १३ आत्मसमर्पित नक्षलवादी तरुण-तरुणींचा विवाहसोहळा पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. आपण महाराष्ट्राच्या पहिल्या पॉईंटवर आलो आहोत. अगदी आपल्या नजरेत दिसेल एवढ्याजवळ छत्तीसगड आहे. कवंडेच्या पोलीस आऊटपोस्टमुळे या भागातील सिक्युरिटीचा खूप मोठा बॅकलॉग भरून निघाला आहे.
हा भाग आजवर सर्व प्रकाराने अलिप्त होता. पण, आता पोलीस इथे आल्यानंतर शासनाच्या सर्व योजना, त्यांचे लाभ लोकांना मिळणार आहेत. शासनावरील लोकांचा विश्वास वाढेल आणि संपूर्ण भाग पोलिसांच्या आणि शासनाच्या देखरेखीखाली आला आहे. आता माओवाद्यांना इथे कोणतेही ऑपरेशन्स राबवता येणार नाही, असे ते म्हणाले.
पुढे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, माझ्या एवढा गडचिरोलीत फिरणारा दुसरा कोणताही मुख्यमंत्री महाराष्ट्रात नाही. या ठिकाणी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत आपले सुरक्षा जवान चांगले काम करत आहेत. या सुरक्षा यंत्रणांचे मनोधैर्य वाढावे म्हणून मी अशा दुर्गम आऊटपोस्टवर येत असतो. सरकार लवकरच गडचिरोलीतील माओवाद पूर्णतः संपुष्टात आणेल.
2014 पूर्वी गडचिरोली विकास आणि विकासाची क्षमता ही फक्त नेत्यांच्या भाषणांमध्येच दिसून येत होती. पण त्यानंतर आम्ही गडचिरोलीत प्रत्यक्ष बदल घडवून आणले. पण आता आपल्याला इथे औद्योगिक विकास साधताना येथील जंगल आणि जमीन वाचवून विकास साधायचा आहे. या प्रकरणी गडचिरोलीचा नैसर्गिक स्वभाव बदलण्याचा प्रयत्न होणार नाही, असे ते म्हणाले.





