पीपीएफ खातेधारकांसाठी सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय, ‘या’ नियमात केला बदल

PPF Nominee Charge | सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) खातेधारकांसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता नॉमिनी अपडेट किंवा त्यामध्ये बदल करायचा असल्यास तुम्हाला त्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. सरकारने नुकताच या नियमात बदल केला आहे. आता पीपीएफ खात्यांमध्ये नॉमिनी अपडेट करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. स्वतः अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
अर्थमंत्र्यांनी सांगितले की, अनेक वित्तीय संस्था नॉमिनी अपडेट करण्यासाठी शुल्क आकारत असल्याची माहिती मिळाली होती. परंतु, आता नियमांमध्ये बदल करून ते पूर्णपणे काढून टाकले गेले आहे.
सरकारने सरकारी बचत प्रोत्साहन सामान्य नियम 2018 (Government Savings Promotion General Rules 2018) मध्ये बदल करून 2 एप्रिल 2025 रोजी एक राजपत्र अधिसूचना जारी केली. याद्वारे, नॉमिनी अपडेट किंवा बदलासाठी आकारले जाणारे 50 रुपये शुल्क रद्द करण्यात आले आहे. या निर्णयामुळे पीपीएफ खातेधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे, कारण आता ते कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय त्यांच्या नॉमिनीची माहिती अपडेट करू शकतील.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी X (पूर्वी ट्विटर) वर याबाबत माहिती देताना सांगितले की, “अलीकडेच माहिती मिळाली होती की अनेक वित्तीय संस्था पीपीएफ खात्यांमध्ये नॉमिनीची माहिती अपडेट किंवा बदलण्यासाठी शुल्क आकारत आहेत. आता, 2 एप्रिल 2025 रोजी जारी केलेल्या राजपत्र अधिसूचनेनुसार, सरकारी बचत प्रोत्साहन सामान्य नियम 2018 मध्ये आवश्यक बदल करण्यात आले आहेत, त्यानंतर आता पीपीएफ खात्यांमध्ये नॉमिनी अपडेट करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
याव्यतिरिक्त, बँकिंग सुधारणा विधेयक 2025 अंतर्गत, खातेदारांना त्यांच्या जमा रकमेच्या पेमेंटसाठी, सुरक्षित ठेवलेल्या वस्तू आणि लॉकरसाठी 4 नॉमिनींपर्यंत जोडण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.





