बायोबबल आणि विलगीकरण नको रे बाबा

नवी दिल्ली – करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने गेल्या जवळपास दहा महिन्यांपासून अनेक क्षेत्रांसह क्रीडा क्षेत्रालाही प्रचंड फटका बसला होता. आता यातून बाहेर पडत असताना विविध स्पर्धा सुरू झाल्या असल्या तरीही आता त्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या बायोबबल सुरक्षा व विलगीकरणाच्या नियमांना आता खेळाडू कंटाळले आहेत. स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे का नाही असा प्रश्न ते विचारत असून ही सुरक्षा व विलगीकरण आता नको रे बाबा अशीच मते विविध क्रीडापटूंनी व्यक्त केली आहेत.
भारतीय संघातील काही क्रिकेटपटूंनीच नव्हे तर ऑस्ट्रेलियाच्याही काही क्रिकेटपटूंनी या बायोबबल व विलगीकरणाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच आता भारताचा प्रख्यात टेनिसपटू रोहन बोपण्णा यानेही हा सगळा प्रकार रोगापेक्षा इलाज भयंकर असा असल्याचे मत व्यक्त केले आहे.
बोपण्णाप्रमाणेच मत ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ऍरन फिंच यानेही करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या विलगीकरणाच्या नियमांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वीही अनेक खेळाडूंनी हा मुद्दा उठवल्यामुळे पुन्हा एकदा बायोबबल सुरक्षेबाबत क्रीडा क्षेत्रात नाराजी पसरली आहे.
करोनामुळे सर्व प्रकारच्या क्रीडा स्पर्धांमध्ये बायोबबल सुरक्षा तसेच विलगीकरणाचे कठोर नियम आखण्यात आले. कुटुंबीयांपासून दूर राहण्याबरोबरच हॉटेलमध्ये एकाच खोलीत संपूर्ण दिवस घालवणे खेळाडूंना अशक्य होत असल्याने अनेक क्रीडापटूंनी याविषयी नाराजी दर्शवतानाच तक्रारही नोंदवली.
ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेला 8 फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार असून बोपण्णा या स्पर्धेच्या पुरुष आणि मिश्र दुहेरीत खेळणार आहे. मात्र, या स्पर्धेसाठी ज्या विमानाद्वारे बोपण्णा ऑस्ट्रेलियात दाखल झाला, त्यातील अनेक खेळाडूंना करोना झाल्याने बोपण्णाला सध्या 14 दिवसांच्या विलगीकरणाला सामोरे जावे लागत आहे. 30 जानेवारीनंतरच बोपण्णाला सराव करण्यास मिळणार आहे.
त्याला सध्या हॉटेलमधील रूममध्येच राहावे लागत आहे. सरावाची परवानगी नसल्याने खोलीतच व्यायाम करण्याबरोबर रूममधील भिंतीवर बोपण्णा टेनिसचा सराव करत आहे. मात्र, 24 तास एकाच खोलीत घालवणे फारच कठीण जात आहे. बोपण्णासह पुरुष दुहेरीत खेळणारा जो सौसाला करोना झाल्याने नवा सहकारी शोधण्याचे आव्हानही त्याच्यापुढे आहे.
दुसरीकडे बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न रेनगेड्सकडून खेळणाऱ्या फिंचने बायोबबलच्या नियमांवर टीका केली आहे. काही दिवसांपूर्वीच मी माझ्या पत्नीशी संवाद साधला. एप्रिल महिन्यापासून मी फक्त 20 ते 21 दिवस तिला प्रत्यक्षात भेटलो आहे. बायोबबल वातावरणात राहणे आव्हानात्मकच नव्हे तर नैराश्य देणारे ठरत आहे. आता येत्या काळात करोनाचा धोका नाहीसा झाला तरीही ही सुरक्षाव्यवस्था पुढील काही महिने कायम राहणार असल्याने पुढील काळातही खेळाडूंना या परिस्थितीशी जूळवून घेत स्पर्धा खेळाव्या लागणार आहेत.
पत्रकार तसेच प्रेक्षकांवर बंधनेच
करोनाचा धोका असल्याने सर्व सुरक्षाव्यवस्था तयार केल्या गेल्या आहेत. त्यातच अन्य व्यक्तींमुळे खेळाडूंना कोणताही धोका होऊ नये, यासाठी भारत व इंग्लंड यांच्यातील क्रिकेट मालिकेसाठीही कठोर नियम तयार करण्यात आले आहेत. बायोबबल सुरक्षाही कायम ठेवली जाणार असल्याने माध्यमांच्या प्रतिनिधींना तसेच प्रेक्षकांनाही याचा फटका बसणार आहे. पत्रकारांना ऑनलाइन परिषदेतच सहभागी होता येणार आहे. तर, प्रेक्षकांना मैदानात प्रवेश नाकारला जाणार आहे. मात्र, जर स्थानिक संघटनेने संपूर्ण जबाबदारी घेतली तरच आसन क्षमतेच्या काही टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्याबाबत विचार सुरू आहे.





