पीएम किसान योजनेचा मिळेना लाभ

शेवगाव – महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेअंतर्गत येथील सामान्य शेतकऱ्यांना मिळणारे अर्थसहाय्य कित्येक दिवसांत प्राप्त झाले नाही. त्यासाठी तहसील कार्यालयाच्या कृषी विभागात खेड्यापाड्यातून वयोवृद्ध लाभार्थी हेलपाटे घालत दिवसेंदिवस ताटकळत बसतात. कागदपत्रांची पूर्तता करूनही योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे हे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. जनशक्ती मंचचे अध्यक्ष ॲड.शिवाजीराव काकडे यांचे नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे, रासपचे राजेंद्र घनवट, शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष आशुतोष डहाळे ,त्र्यंबक महाराज बोरुडे, ज्ञानेश्वर लोढे, राजेंद्र लोणकर यांचेसह संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी तहसीलदार प्रशांत सांगडे, तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले यांना घेराव घातला.
याअगोदर हे काम पीएम किसान योजनेचा ओटीपी देऊन खासगी सेतू चालक करत. मात्र, त्यांनी अर्थपूर्ण व्यवहार करत जमिनधारक नसलेल्या अनेकांना त्याचा लाभ दिला. यात काही अधिकारी, कर्मचारीही असून त्यांना शोधून आता त्याची वसुली केली जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सध्या हे काम तालुका कृषी खात्याच्या देखरेखीखाली एका खासगी व्यक्तीकडून केले जाते.
मात्र, शेतकऱ्यांना आगीतून फुफाटयात पडल्यासारखे झाले आहे . हे महाशाय शेतकऱ्यांना हेलपाटे मारायला लावतात, शिवाय सायंकाळी सहानंतर निवांत यायला सांगतात. येथेही प्रत्येक चकरेला हात ओले करण्याची पाळी येते, अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकरी देत होते. तालुका कृषी अधिकारी टकले यांनी त्यांच्याकडे मनुष्यबळ नसल्याने दिरंगाई होत असल्याचे सांगितले . त्यावर तहसीलदार सांगडे यांनी यातून मार्ग काढून शेतकऱ्यांना तातडीने न्याय देण्याच्या सूचना दिल्या .
ॲड. काकडे यांनी काढला मार्ग
पीएम किसान योजनेचे अर्थसहाय्य सामान्य शेतकऱ्यांना उपलब्ध होण्यासाठी केवळ मनुष्यबळ उपलब्ध नाही म्हणून येणारी अडचण ओळखून ॲड. काकडे यांनी आपल्या संस्थेतील दोन संगणक तज्ज्ञ सर्वांचे काम मार्गी लागेपर्यंत कृषी खात्याला देऊन त्यातून मार्ग काढला.




