निवेदिता सराफ यांची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीसाठी होणार सज्ज; प्रोमो प्रदर्शित

Nivedita Saraf | अभिनेत्री निवेदिता सराफ यांची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. स्टार प्रवाहवर ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेत त्या दिसणार आहेत. निवेदिता यांच्यासह या मालिकेत अभिनेते मंगेश कदम मुख्य भूमिकेत आहेत. यापूर्वी निवेदिता यांनी अनेक मराठी मालिकांमध्ये आईची भूमिका साकारली आहे. आता पुन्हा एकदा त्या आईच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
स्टार प्रवाहवर नुकताच ‘उदे गं अंबे’ मालिकेचा पहिला प्रोमो प्रसारित करण्यात आला. या पाठोपाठ आता आणखी एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेच्या प्रोमोमध्ये त्यांचा रिटायरमेंटचा दिवस असतो. “रिटायर झाल्यावर आपण दोघे मिळून गावी जाऊया” असं ते आपल्या पत्नीला सांगत असतात. परंतु, निवेदिता मुलांची व कुटुंबाची काळजी कशी घेणार याचा विचार करत असतात.
मंगेश आणि निवेदिता यांच्या व्यतिरिक्त या मालिकेत इतर कोणते कलाकार आहेत याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. मालिकेच्या पहिल्या प्रोमोमध्ये फक्त निवेदिता व मंगेश कदम यांची जोडी पाहायला मिळत आहे. शिवाय मालिका कधीपासून सुरू होणार, याची तारीखही समोर आलेली नाही. तसेच आता हे जोडपं रिटायर झाल्यावर गावी जाणार की नाही? हे पाहणंही उत्सुकतेचं ठरणार आहे.
View this post on Instagram
स्टार प्रवाहने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये निवेदिता एका आईची भूमिका साकारत आहेत. यात त्या आई म्हणून मुलगा-सुनेला ऑफिससाठी डब्बा देण्यापासून ते नातीच्या केसांच्या वेण्या घालण्यापर्यंत सर्व कामे करत असते. तर मंगेश यांची निवृत्तीनंतर गावी जाण्याची योजना असते. पण आईला मुलांना सोडून गावी जाणे पटलेले नसते. त्यामुळे आता आई-बाबा निवृत्तीनंतर त्यांना अपेक्षित आयुष्य जगतील का, हे या मालिकेत पाहायला मिळणार आहे. Nivedita Saraf |
हेही वाचा:
अरे वाह ! 4 दिवस काम करा अन् 3 दिवस सुट्टी मिळवा ; सरकारचा निर्णय लवकरच अंमलात येणार





