Nitin Nabin : नरेंद्र मोदी हे जनतेने थेट निवडलेले पहिले पंतप्रधान; नितीन नविन यांच्याकडून मोदींचे कौतुक
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन (Nitin Nabin) यांनी बुधवारी नरेंद्र मोदी यांच्या सरकारप्रमुख म्हणून २५ वर्षांच्या प्रवासाचे वर्णन सततच्या संघर्षाचा अविस्मरणीय अध्याय असे केले.

Nitin Nabin : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन (Nitin Nabin) यांनी बुधवारी नरेंद्र मोदी यांच्या सरकारप्रमुख म्हणून २५ वर्षांच्या प्रवासाचे वर्णन सततच्या संघर्षाचा अविस्मरणीय अध्याय असे केले. जनतेच्या थेट जनादेशातून निवडले गेलेले देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून त्यांनी मोदींचे कौतुक केले.
एका कार्यक्रमात बोलताना नवीन (Nitin Nabin) यांनी दावा केला की, २०१४च्या लोकसभा निवडणुकीत प्रथमच पंतप्रधानपदाचा उमेदवार पक्षाचा केवळ चेहरा न राहता थेट जनतेसमोर प्रचाराचा मुख्य चेहरा म्हणून सादर करण्यात आला. मतदारांच्या थेट जनादेशातून पंतप्रधान होणारे मोदी पहिले नेते ठरले, असे ते म्हणाले.
जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या पंतप्रधानपदाचा संदर्भ देताना नवीन म्हणाले की, या नेत्यांना पंतप्रधान होण्यापूर्वी काँग्रेसमधील नेत्यांच्या निवडीचा सामना करावा लागला होता. राजीव गांधी यांनी आई इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर पंतप्रधानपद स्वीकारले आणि त्यानंतर जनतेचा कौल मिळवला, असे त्यांनी नमूद केले.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या पुस्तकात २०१४च्या लोकसभा निवडणुकीचे वर्णन मोठा आणि महत्त्वपूर्ण बदल असे केल्याचा उल्लेख नविन यांनी केला. मोदी कोणत्याही राजकीय घराण्यातून आलेले नव्हते आणि त्यांना राजकीय वारसाही मिळाला नव्हता. संघटनात्मक अनुभव आणि जनतेच्या पाठिंब्याच्या जोरावर त्यांनी पंतप्रधानपद मिळवले, असे नवीन (Nitin Nabin) म्हणाले.
आपली वेगळी ओळख
संघटनात्मक अनुभव आणि जनतेचा कौल यांच्या जोरावर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, असे नविन (Nitin Nabin) यांनी सांगितले. मोदींच्या सरकारप्रमुख म्हणून २५ वर्षांच्या प्रवासाचा गौरव करताना त्यांनी हा टप्पा भाजप कार्यकर्ते आणि देशवासीयांसाठी अविस्मरणीय असल्याचे म्हटले. संघर्षातून सुरुवात करून प्रत्येक आव्हानाचा सामना करत मोदींनी देशाच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली, असेही ते म्हणाले. त्यांच्या अखंड, अढळ आणि अथक प्रवासासाठी नवीन यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या.






