Nitin Gadkari: ‘मैं डंडा लेके बैठा हूँ, मुझे मैनेज करने वाला पैदा नहीं हुआ’, असे म्हणत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोलियम लॉबीवर जोरदार टीका करत स्पष्ट शब्दांत इशारा दिला. ते पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी बोलत होते. त्यांच्या या विधानाची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. यावेळी गडकरी यांनी, “आपला देश आत्मनिर्भर झाला पाहिजे. मी याआधी अनेक योजना सांगितल्या तेव्हा लोक माझ्यावर हसायचे आणि मला वेड म्हणायचे. पण मी त्या क्षेत्रात काम करून दाखवले आहे.” असे म्हटले. ग्रीन एनर्जीच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देताना त्यांनी कठोर भूमिकाही व्यक्त केली. “मैं डंडा लेके बैठा हूँ, मुझे मैनेज करने वाला पैदा नहीं हुआ. अच्छा काम करो, नहीं तो मैं ठोकता हूँ,” असे म्हणत त्यांनी उपस्थितांमध्ये एकच हशा आणि टाळ्यांचा कडकडाट निर्माण केला. Nitin Gadkari: नितीन गडकरी यांनी पेट्रोलियम लॉबीवर थेट निशाणा साधत, “माझ्या विरोधात पेट्रोलियम लॉबी मोठ्या प्रमाणात आहे. ही लॉबी ग्रीन एनर्जीला सहजपणे काम करू देईल असे वाटत नाही.” मात्र अशा दबावाला आपण घाबरणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. Nitin Gadkari “जो लढाई सोडून पळतो तो संपतो. त्यामुळे भीती बाळगण्याची गरज नाही. आम्ही दुसऱ्याच्या छातीवर चढूनही लढू शकतो, जिंकू शकतो आणि यशस्वी होऊ शकतो,” असे सांगत त्यांनी ग्रीन एनर्जी क्षेत्रातील उद्योजकांना आत्मविश्वास न सोडण्याचे आवाहन केले. देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी पर्यायी ऊर्जा स्रोतांचा विकास करणे ही काळाची गरज असल्याचे सांगत गडकरी यांनी जैवइंधन, इथेनॉल, ग्रीन हायड्रोजन आणि इतर पर्यायी ऊर्जेच्या प्रकल्पांना चालना देण्यावर भर दिला. पुण्यातील या कार्यक्रमात गडकरी यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि पेट्रोलियम लॉबीवर केलेल्या टोलेबाजीमुळे राजकीय तसेच औद्योगिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. Nitin Gadkari: