Nitin Gadkari । टोलनाके, फास्ट टॅग होणार बंद; नितीन गडकरी लवकरच आणणार ‘जीपीएस आधारित टोल यंत्रणा’

Nitin Gadkari । नेहमीच टोल आणि फास्टॅग सुविधामुळे प्रवाशांना त्रास होत असल्याच्या बातम्या समोर येत असतात. टोलनाक्यांवर लागणाऱ्या वाहनांच्या रांगा पाहून सरकारने फास्टॅग सुविधा लाँच केली होती. मात्र फास्टॅगमुळेही अनेक लोकांना इतर समस्यांना तोंड द्यावे लागत होते.
अशात आता टोल वसुलीसाठी जगातलं सर्वोत्तम तंत्रज्ञान असलेली सॅटलाईट आधारित टोल टॅक्स सिस्टीम आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत दिली आहे
नितीन गडकरी म्हणाले,’रस्त्यावरून प्रवाशांना शक्य तितक्या लवकर प्रवास करता यावा. त्यामुळे इंधन वाचते. त्याचबरोबर संबंधित लोकांची कार्यक्षमता वाढते. अशात लोकांचा रस्त्यावर कमीत कमी वेळ जावा अशी सरकारची इच्छा आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही करीत असलेल्या उपाययोजनांना यश मिळत आहे.
ते पुढे म्हणाले की, 2018-19 मध्ये टोल प्लाझावर साधारणपणे प्रत्येक वाहनाला आठ मिनिट थांबावे लागत होते. त्यानंतर फास्ट टॅग यंत्रणा सुरू करण्यात आली. आता 2021- 22 मध्ये वाहनधारकांना टोल प्लाझावर केवळ 47 सेकंद थांबावे लागत आहे.
जीपीएस आधारित टोल कलेक्शन सुरू केल्यानंतर ग्राहकांना थांबण्याची गरज पडणार नाही. त्याचबरोबर हे वाहन रस्त्यावरून नेमके किती काळ चालले यावरून तेवढ्याच कालावधीसाठीचा टोल या संबंधित ग्राहकाकडून घेतला जाऊ शकतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात करून वाहनधारकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा विचार आहे.





