Palkhi Marg – श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच पाहणी केली असून, या रस्त्याचे काम लवकरच पूर्ण केले जाईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे. आगामी आषाढी पालखी सोहळा लक्षात घेता, सध्यातरी या मार्गावरील मोठे खड्डे तातडीने बुजवण्याची मागणी परिसरातून व वाहनचालकांकडून केली जात आहे. या पालखी मार्गावर लिमटेक ते बेलवाडी दरम्यान अनेक ठिकाणी रस्त्याची चाळण झाली आहे. विशेषतः काटेवाडी ते भवानीनगर परिसरामध्ये नीरा डाव्या कालव्याच्या खालील बाजूस रस्त्यावर खड्डे पडल्याने वारंवार अपघात होत आहेत. यामुळे वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. गेल्या तीन वर्षांपासून या भागातील नागरिक खड्ड्यांचा सामना करत असून, वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे. आजवर या रस्त्यावरील खड्डे डांबरीकरण करून कधीही कायमस्वरूपी बुजवले गेले नाहीत. काही वेळा केवळ मुरूम टाकून तात्पुरती मलमपट्टी केली जाते. मात्र, अवघ्या तीन ते चार दिवसांत तो मुरूम खड्ड्यांतून बाहेर पडतो आणि परिस्थिती ‘आहे त्यापेक्षा गंभीर’ बनते. गेल्या तीन वर्षांपासूनची ही डोळेझाक आता थांबवावी, अशी मागणी नागरिकांची आहे. पालखी आगमनापूर्वी डांबरीकरणाची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केल्यापासून हा राष्ट्रीय महामार्ग लवकरच पूर्ण होईल, अशी खात्री नागरिकांना पटली आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी याच मार्गावरून पंढरपूरकडे प्रस्थान करते. पालखी सोहळा या भागात येण्यापूर्वी रस्त्याची अंतिम दुरुस्ती होईलच; परंतु सध्याची बिकट अवस्था पाहता, वाहनधारकांच्या सुरक्षिततेसाठी तत्काळ डांबरीकरण करून खड्डे बुजवावेत, अशी आग्रही मागणी जोर धरत आहे.