Nitin Gadkari: भारतात घटस्फोटांवर बंदी घालावी का?, नितीन गडकरी म्हणाले…

Nitin Gadkari on Live-in Relationship: लिव्ह इन रिलेशनशिप चुकीचं असून, यामुळे सामाजिक व्यवस्था उद्ध्वस्त होईल, असे मत भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना गडकरी यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले. या मुलाखतीमध्ये बोलताना गडकरी यांनी लिव्ह-इन रिलेशनशिप आणि समलैंगिक विवाहामुळे सामाजिक व्यवस्था कोलमडून पडेल, असे मत व्यक्त केले.
मुलाखतीमध्ये गडकरी यांना लिव्ह-इन रिलेशनशिप आणि समलैंगिक विवाहाबाबत त्यांचे मत विचारण्यात आले. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की, लिव्ह इन रिलेशनशिप चुकीचं आहे. यामुळे समाजिक व्यवस्था कोलमडून पडेल. एकदा मी लंडनमध्ये ब्रिटिश संसदेचा दौरा केला होता. यावेळे ब्रिटनचे पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्र्यांना त्यांच्या येथील सर्वात मोठी समस्या कोणती? असा प्रश्न विचारला. तेव्हा मला समजले की, यूरोपियन देशातील प्रमुख समस्या पुरूष-महिलांनी लग्नामध्ये रस दाखवत नाही व लिव्ह-इन रिलेशनशीपला प्राथमिकता देतात.
तुम्ही जर लग्न केले नाही तर मुलं कशी जन्माला येतील? मुलांचे भविष्य काय असेल? तुम्ही जर सामाजिक व्यवस्थाच उद्धवस्त केली तर त्याचा काय परिणाम होईल?, असे प्रश्न गडकरींनी उपस्थित केला.
यावेळी बोलताना गडकरींना भारतात घटस्फोटांवर बंदी घालावी का? असा प्रश्नही विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, ‘अजिबात नाही. मात्र, लिव्ह इन रिलेशनशिप योग्य नाही. यामुळे सामाजिक व्यवस्था कोलमडून पडेल. सामाजिक व्यवस्थेच्या नियमांचे पालन करायला हवे.’
देशातील लिंग गुणोत्तर राखण्याची गरज देखील गडकरींनी व्यक्ती केली, ‘जर 1,500 स्त्रिया आणि फक्त 1,000 पुरुष असतील अशी वेळ आली तर पुरुषांना दोन लग्न करण्याची परवानगी द्यावी लागेल’, असे मत त्यांनी व्यक्त केले.





