Nitin Gadkari : स्वतःला मागास म्हणणे हा राजकीय स्वार्थ; नितीन गडकरी यांचे मोठे वक्तव्य

नवी दिल्ली : मागासलेपणा आता राजकीय स्वार्थ बनला आहे. सध्या जाती आणि भाषेवर आधारित समाजातील विभागणी चिंताजनक आहे. लोकांना जाती आणि भाषेच्या नावाखाली राजकारण करण्यापासून दूर राहून देशाच्या एकता आणि विकासासाठी एकत्र काम करावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. दरम्यान, गेल्या काही काळापासून गडकरी यांचे अनेक विधाने चर्चेचा विषय ठरली आहेत. दिल्ली येथे आयोजीत एका कार्यक्रमात ते बोलत होते.
नितीन गडकरी म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (आरएसएस) कधी जातीयवादी तर कधी सांप्रदायिक म्हणत लक्ष्य केले जात होते. पण, सत्य हे आहे की संघात कोणाचीही जात विचारली जात नाही आणि तिथे भेदभाव किंवा अस्पृश्यतेलाही स्थान नाही. मात्र, विरोधकांकडून संघाची विविध प्रसंगी बदनामी करण्यात आली, असे त्यांनी नमूद केले.
देशात सध्या जात, भाषा आणि इतर गोष्टींच्या नावाखाली समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, जो चिंतेचा विषय आहे. आज मागासलेपणा हा राजकीय स्वार्थ बनत चालला आहे. प्रत्येकजण म्हणत आहे की मी मागास आहे. आम्हाला जगातील सर्वांचे कल्याण आणि प्रगती हवी आहे, अगदी विरोध करणाऱ्यांचेही. जेव्हा लोक एकजूट राहतील तेव्हाच देश प्रगती करेल आणि मजबूत होईल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.





