सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरणात तणाव वाढला आहे. निकालानंतर अवघ्या २४ तासांत राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सोशल मीडियावर एक आक्रमक आणि सूचक पोस्ट केली असून, यामुळे कोकणातील राजकारणात मोठा भूकंप येण्याचे संकेत मिळत आहेत. सोमवारी सकाळी केलेल्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गप्प होतो .. पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी.. पण काही गोष्टी बोलल्या नाही तर खऱ्या वाटायला लागतात.. पण आता ती वेळ आली आहे ! — Nitesh Rane (@NiteshNRane) December 22, 2025 नितेश राणे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो… पण काही गोष्टी बोलल्या नाही तर खऱ्या वाटायला लागतात… पण आता ती वेळ आली आहे!” या एकाच विधानाने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. नितेश राणेंचा हा रोख नेमका कोणाकडे आहे? महायुतीतील इतर नेत्यांकडे की स्वतःचे थोरले बंधू तथा शिवसेना (शिंदे गट) आमदार नीलेश राणेंकडे? याबाबत जोरदार तर्कवितर्क सुरू आहेत. निवडणुकीच्या निकालांनी राणे कुटुंबातील अंतर्गत कलह उघडकीस आणला आहे. विशेषतः कणकवली आणि मालवण नगरपरिषदेच्या निकालांनी गणिते बिघडवली आहेत. मालवणमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने (शिंदे गट) भाजपला मात देत नगराध्यक्षपदासह बहुमत मिळवले असून, ममता वराडकर या शिंदे गटाच्या उमेदवार विजयी झाल्या आहेत. तर कणकवलीत भाजपने १५ पैकी ८ ते ९ जागा जिंकल्या असल्या तरी नगराध्यक्षपद शहर विकास आघाडीचे संदेश पारकर यांनी पटकावले. नितेश राणेंच्या बालेकिल्ल्यातच बसलेला हा धक्का त्यांच्या संतप्त प्रतिक्रियेचे मुख्य कारण मानले जात आहे. निवडणूक प्रचारादरम्यानच राणे बंधूंमधील तणाव उघड झाला होता. नीलेश राणे यांनी भाजपवर पैशांच्या जोरावर निवडणूक लढवण्याचा आरोप केला होता, तर नितेश राणे यांनी प्रचारातून काहीसा अलिप्त राहण्याची भूमिका घेतली होती. विजयानंतर नीलेश राणे यांनी नितेश यांच्या पोस्टवर थेट प्रतिक्रिया देणे टाळले असले तरी, त्यांनी भाजपमधील काही नेत्यांवर सडकून टीका केली. “नारायण राणे साहेबांना या प्रक्रियेतून काही लोकांनी बाजूला सारले, म्हणून हा संघर्ष निर्माण झाला. ही पक्षाची नाही तर वैयक्तिक लोकांची चूक आहे,” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपमधील काही नेत्यांकडे बोट दाखवले. निवडणूक काळात नितेश राणे प्रचारात शांत राहिले होते, मात्र आता ते मौन सोडण्याच्या तयारीत दिसत आहेत. त्यांच्या या गौप्यस्फोटाच्या इशाऱ्यामुळे सिंधुदुर्गातील महायुतीचे समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नारायण राणे यांना बाजूला सारणारे ‘ते काही लोक’ नेमके कोण आहेत? नितेश राणे आपल्याच पक्षातील नेत्यांवर तोफ डागणार की बंधू नीलेश राणेंना प्रत्युत्तर देणार? याकडे आता संपूर्ण कोकणाचे आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ही घटना राणे कुटुंबातील राजकीय युद्धाला नवे वळण देणारी ठरू शकते. महायुतीतील अंतर्गत कलह उघड झाल्यास याचा परिणाम आगामी जिल्हा परिषद निवडणुकांवरही होण्याची शक्यता आहे. राजकीय निरीक्षक या घडामोडींकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत.