रत्नागिरी : राज्यातील महायुती सरकारला सत्तेत आणण्यात हिंदू समाजाचा मोठा हात आहे. अन्य धर्मियांनी अपेक्षित मतदान केले नाही. तुम्ही त्यांच्या मोहल्ल्यात फिरलात मात्र, तुम्हाला मतदान झाले नाही. त्यामुळे हिंदू समाजाने जर आम्हाला सत्तेत बसवले असेल तर हिंदू समाजाची सेवा करणे, त्यांचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी असल्याचे मंत्री नितेश राणे, चिपळून येथील रक्षाबंधन कार्यक्रमात बोलताना म्हणाले. सामाजिक संस्थेच्या वतीने चिपळून येथे रक्षाबंधन व राखी संकलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना नितेश राणे म्हणाले की, अवतीभवती पाहत असताना लव्ह जिहाद सारखे प्रकरणे दिसतात, तेव्हा हिंदुत्ववादी सरकार का असावे यांची जाणीव होते. विकास होत राहील पण आपण आपल्या राज्यात महिलांना सुरक्षित ठेऊ शकत नसेल तर काय उपयोग? राज्यात जिहादच्या निमित्ताने वाकड्या नजरेने आपल्या माता-भगिणींकडे पाहिले जाते. त्याला राखी संकलन हे उत्तर आहे. आज १४ हजार राख्या जमा केल्या, त्या प्रत्येकापर्यंत पोहोचवल्या. त्याचा परिणाम येत्या काळात आपल्याला दिसून येणार आहे. त्या निमित्ताने हिंदुत्व भक्कम होणार असल्याचे नितेश राणे बोलताना म्हणाले.