Nimisha Priya : येमेनची राजधानी सना येथील तुरुंगात ३८ वर्षीय भारतीय परिचारिका निमिषा प्रिया ही प्रत्येक क्षणी मृत्युला सामोरे जात आहे. येथील न्यायालयाने तिच्या फाशीची तारीख १६ जुलै निश्चित केली आहे. आता तिचे आयुष्य दोन दिवसांनी संपेल. मात्र, अश्यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. सध्या फाशी टळल्याची सूचना तुरुंग प्रशासनाने दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार निमिषा प्रकरणात ग्रांड मुफ्ती अबूबकर अहमद यांची पीडित अब्दो महदी कुटुंबासोबत चर्चा सुरु आहे. पहिल्यादिवसाची बोलणी सकारात्मक झाली. त्यामुळे पुढे सुद्धा चर्चा होऊ शकते. म्हणून फाशी टाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निमिषावर बिझनेस पार्टनर अब्दो महदीच्या हत्येचा आरोप आहे. 2008 साली केरळमधून नोकरीसाठी निमिषा प्रिया येमेनमध्ये गेली होती. तिच्यावर अब्द महदीच्या हत्येचा आरोप आहे. निमिषा तेव्हापासून सना जेलमध्ये बंद आहे. या वर्षाच्या सुरुवातीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. या महिन्यातच तिला फाशी होणार होती. त्यानंतर निमिषाला वाचवण्याचे प्रयत्न वेगाने सुरु झाले. निमिषा प्रिया इंटरनॅशनल काऊन्सिल नावाची एक संस्था बनवण्यात आली. ती ब्लड मनी जमा करण्यासाठी सक्रीय होती. येमेनच्या शरिया कायद्यानुसार पीडित कुटुंब पैसे स्वीकारुन दोषी व्यक्तीला माफ करु शकतं. ‘ब्लड मनी’ म्हणजे काय? येमेनमध्ये ब्लड मनी हा इस्लामिक न्यायव्यवस्थेचा एक भाग आहे, त्याला ‘दिय्या’ असेही म्हणतात. गंभीर शारीरिक दुखापतीसह खून झाल्यास तो आर्थिक भरपाई आहे. जर एखाद्या व्यक्तीने चुकून किंवा जाणूनबुजून एखाद्याची हत्या केली तर ते मृताच्या कुटुंबावर अवलंबून असते की ते आरोपीला शिक्षा द्यायचे की शिक्षेऐवजी ‘ब्लड मनी’ घ्यायचा. काही इस्लामिक देशांमध्ये ही संकल्पना कायदेशीर स्वरूपात अस्तित्वात आहे. हे शरिया कायद्यावर आधारित आहे. हत्येच्या गंभीर प्रकरणांमध्ये, ब्लड मनी ऐवजी, ‘कसास’ म्हणजेच सूडाची शिक्षा देखील दिली जाऊ शकते. जर कोणी ब्लड मनी स्वीकारला तर त्याचा अर्थ असा होतो की त्याने गुन्हेगाराला माफ केले आहे. कोण आहे निमिषा? केरळमधून आलेली निमिषा प्रिया नर्सिंग प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर 2011 मध्ये यमनला गेली होती. ती आपल्या आई-वडिलांना चांगले आयुष्य देण्यासाठी तेथे गेली होती असे सांगितले जाते, कारण तिचे आई-वडील रोजंदारीवर काम करणारे मजूर होते. सुरुवातीला तिने यमनमधील अनेक रुग्णालयांमध्ये दिवसरात्र काम केले. त्यानंतर तिने स्वतःचे क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला. ती 2014 मध्ये तलाल अब्दो महदीच्या संपर्कात आली. तलालने निमिषाला यमनमध्ये क्लिनिक सुरू करण्यास मदत करण्याचे वचन दिले. निमिषाला वाटले की आता तिचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. काय आहे संपूर्ण प्रकरण? यमनमधील व्यापार कायद्यानुसार, जो व्यक्ती त्या देशाचा नागरिक नाही, त्याला देशात व्यवसाय सुरू करण्यासाठी स्थानिक व्यक्तीसोबत भागीदारी करावी लागते. निमिषाने कायद्यांनुसारच क्लिनिक उघडण्यासाठी भागीदारी केली आणि अटी मान्य केल्या. निमिषाने 2015 मध्ये महदीसोबत तिचे क्लिनिक सुरू केले. पण लवकरच त्यांच्यात मतभेद निर्माण झाले. तिने महदीवर गैरवर्तन आणि छळाचा आरोप केला होता. महदीने तिचा पासपोर्टही काढून घेतला होता. निमिषाने महदीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. तिला 2016 मध्ये अटक करण्यात आली. परंतु काही अहवालानुसार, त्याला काही दिवसांनंतरच सोडण्यात आले. 2017 मध्ये हे वाद नवीन वळणावर पोहोचले. आपला पासपोर्ट परत मिळवून भारतात परत येण्यास उत्सुक असलेल्या निमिषाने एका स्थानिक तुरुंग रक्षकाची मदत घेतली, ज्याने महदीला अक्षम करण्यासाठी शामक औषधांचा वापर करण्याचा सल्ला दिला. त्या रक्षकाचा सल्ला मानून, निमिषाने तिचा पासपोर्ट त्याच्या ताब्यातून मिळवण्याच्या प्रयत्नात त्याला शामक औषधांचे इंजेक्शन दिले. जास्त डोसमुळे त्याचा मृत्यू झाला, ज्यामुळे निमिषाला अटक करण्यात आली आणि या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले. परदेशात आतापर्यंत किती भारतीयांना फाशी देण्यात आली : निमिषा प्रिया ही परदेशात मृत्युदंडाची शिक्षा भोगणारी पहिली भारतीय नाही. मार्च २०२५ मध्ये भारत सरकारने संसदेत सांगितले की जगातील आठ देशांमध्ये ४९ भारतीय नागरिकांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. फक्त संयुक्त अरब अमिरातीमध्ये २५ भारतीय नागरिकांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह यांच्या मते, संयुक्त अरब अमिरातीमध्ये २५ भारतीयांना, सौदी अरेबियामध्ये ११, मलेशियामध्ये सहा, कुवेतमध्ये तीन आणि इंडोनेशिया, अमेरिका, कतार, येमेनमध्ये प्रत्येकी एका भारतीयाला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे, म्हणजेच एकूण ४९ लोकांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे आणि ते त्याची अंमलबजावणी होण्याची वाट पाहत आहेत.