Nimisha Priya : निमिषाला वाचवण्यात गंभीर आरोपांचे अडथळे

नवी दिल्ली – निमिषा प्रिया या मूळची केरळची रहिवासी असणाऱ्या परिचारिकेला वाचवण्याची जोरदार मागणी होत आहे. मात्र, तिला वाचवण्याच्या प्रयत्नांत हत्या प्रकरणी असणारे गंभीर आरोप अडथळे ठरत आहेत.
निमिषाला येमेनमध्ये फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्या शिक्षेची अंमलबजावणी १६ जुलैला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिला वाचवण्याची आग्रही मागणी कुटूंबीयांबरोबरच विविध राजकीय पक्ष, संघटनांकडून करण्यात येत आहे.
त्यासाठी राजनैतिक मार्गांनी प्रयत्न करण्याचे साकडेही केंद्र सरकारला घालण्यात आले. येमेनमधील व्यावसायिक भागीदाराच्या हत्येप्रकरणी निमिषाला २०२० यावर्षी दोषी ठरवण्यात आले.
औषधाची अधिक मात्रा देऊन व्यावसायिक भागीदाराची हत्या केल्याचा ठपका तिच्यावर ठेवण्यात आला. मृतदेहाची विल्हेवाट निर्घूणपणे लावण्याचा प्रयत्न केल्याचाही तिच्यावर आरोप आहे. ते आरोप अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत.
त्यामुळे निमिषाला वाचवण्याचे प्रयत्न निष्प्रभ ठरत आहेत, अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आली. हत्या झालेल्या व्यावसायिक भागीदाराच्या कुटूंबीयांशी संपर्क साधण्यात आला.
त्यांना आर्थिक भरपाई देण्याचीही तयारी दर्शवण्यात आली. मात्र, भरपाईही स्वीकारण्यास ते कुटूंब राजी नसल्याने वाटाघाटींना यश मिळालेले नाही, असेही सुत्रांनी नमूद केले.





