“पवार साहेबांचं राजकारण किती खालच्या पातळीचं…” पवारांनी पुरंदरेंवर केलेल्या टीकेनंतर निलेश राणेंचे ट्विट

मुंबई – खोटा इतिहास सांगणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांची भाषणे आणि लेखनाइतका अन्याय शिवछत्रपतींवर दुसऱ्या कुणीही केला नाही असं मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एका कार्यक्रमादरम्यान व्यक्त केलं होत. त्यानंतर आता भाजप नेते निलेश राणे यांनी पवारांचं एक पत्र सोशल मीडियावर शेअर केलं आहे ज्यात पवारांनी पुरंदरेंच्या कार्यच कौतुक केल्याचे पाहायला मिळते.
शरद पवार यांनी बाबासाहेब पुरंदरेंचं कौतुक केलेलं पत्र ट्विट करत कठोर शब्दात टीका देखील केली आहे. पवार साहेबांचं राजकारण किती खालच्या पातळीचं असू शकतं याचा धडधडीत पुरावा असं म्हणत राणेंनी हे पत्र शेअर केलं आहे. “१६ मे १९७४ रोजी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याचं कौतुक करणाऱ्या शरद पवारांना आज त्यांचं लिखाण चुकीचं वाटू लागलं आहे. ह्याच वृत्तीमुळे पवार साहेब बदनाम आहेत”. असं देखील राणेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
पवार साहेबांचं राजकारण किती खालच्या पातळीचं असू शकतं याचा धडधडीत पुरावा. १६ मे १९७४ रोजी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याचं कौतुक करणाऱ्या शरद पवारांना आज त्यांचं लिखाण चुकीचं वाटू लागलं आहे. ह्याच वृत्तीमुळे पवार साहेब बदनाम आहेत. pic.twitter.com/abObhA8qUq
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 24, 2022
शरद पवार नेमकं काय म्हणाले होते
धादांत खोटा इतिहास सांगणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांची भाषणे आणि लेखनाइतका अन्याय शिवछत्रपतींवर दुसऱ्या कुणीही केला नाही, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं होत. तसंच, शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव यांचं योगदान काय ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नव्या पिढीसमोर वास्तववादी इतिहास येण्याची गरज आहे, असं पवार यावेळी म्हणाले होते.





