पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. कोथरूडमधील गोळीबार प्रकरणात मकोका (MCOCA) कायद्यांतर्गत कारवाई झाल्यानंतर तो पोलिसांना चकवा देऊन परदेशात पळून गेल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. बनावट कागदपत्रे आणि नाव बदलून (Ghaywal ऐवजी Gaywal) त्याने पासपोर्ट मिळवला, आणि आता तो स्वित्झर्लंडमध्ये लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्याच्या पत्नी आणि मुलाने मात्र भारतात परत येत चौकशीच्या भीतीने लपण्याचा प्रयत्न केला आहे. पण या गुंडाने एवढी अमाप संपत्ती कशी कमावली? धाराशिव जिल्ह्यातील पवनचक्की कंपन्यांवर धमक्या देऊन खंडणी उकळण्यापासून ते गुंतागुंतीच्या पैशांच्या देवाणघेवाणीपर्यंत घायवाळच्या ‘वसुली पॅटर्न’ने पोलिस आणि राजकीय नेत्यांना हादरवले आहे. पुणे पोलिसांनी त्याची १० बँक खाती गोठवली असून, ३८.२६ लाख रोख रक्कम जप्त केली आहे. मकोका कारवाईनंतर पलायन, बनावट पासपोर्टचा खेळ कोथरूडमधील रस्त्यावरील भांडणात घायवाळच्या टोळीने गोळीबार करून दोघांना जखमी केले. या प्रकरणात निलेशसह १० जणांवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला. दरम्यान, घायवाळने आपले आडनाव बदलून आणि बनावट पत्ता दाखवून २०२० मध्ये तात्काळ पासपोर्ट मिळवला. अहिल्यानगर पोलिसांनी व्हेरिफिकेशनमध्ये ‘जागेवर सापडला नाही’ असा अहवाल दिला तरीही पासपोर्ट मंजूर झाला. यामुळे पोलिस आणि पासपोर्ट कार्यालयातील हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता लूकआऊट सर्क्युलर (LOC) जारी झाल्याने त्याला अटक होण्याची शक्यता वाढली आहे. पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितल्याप्रमाणे, घायवाळने लंडनमध्ये आलिशान घर बांधले असून, तिथेही त्याचे ‘साम्राज्य’ पसरले आहे. पवनचक्की कंपन्यांवर धमक्या आणि राजकीय डीलिंग घायवाळवर हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण, मारामारीसह १७ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. २००० च्या दशकात तो गजा मारणे याचा हातमाग होता, आणि त्यानंतर स्वतंत्रपणे गुन्हेगारी साम्राज्य उभे केले. धाराशिव जिल्ह्यातील पवनचक्की कंपन्यांवर धमक्या देऊन तो ‘प्रोटेक्शन मनी’ म्हणून खंडणी उकळत असे. शेतकऱ्यांना भळीक घालून पैसे वसूल करणे, आणि कंपन्यांच्या गाड्या फोडणे-कर्मचाऱ्यांना मारहाण करणे हे त्याचे सिग्नेचर स्टाइल! खंडणीचे पैसे वरदहस्त असलेल्या आमदारांना हिस्सा देऊन राजकीय संरक्षण मिळवत असे. विरोध करणाऱ्यांना शेतकऱ्यांमार्फत वसुली करायची – हीच त्याची ‘ट्रिक’! एप्रिल २०२५ मध्ये धाराशिवमधील कुस्ती स्पर्धेत एका पैलवानाने त्याला सार्वजनिकपणे थप्पड मारली होती, ज्यामुळे त्याचे गुन्हेगारी नेटवर्क उघड झाले. खंडणीचे रोख पैसे थेट हाताळणे धोकादायक झाल्याने घायवाळने गुंतागुंतीचा नेटवर्क उभारला. ‘पृथ्वीराज एंटरप्राइजेस’ नावाच्या फर्ममार्फत पैसे त्याच्या ड्रायव्हरच्या किंवा ड्रायव्हरच्या पत्नीच्या खात्यात जमा होत असत. हा ड्रायव्हर म्हणजे मुळशीचा सरपंच निलेश तोंडे! त्याच्या ‘राईट हँड’ विकी चव्हाणकडे हे व्यवहारांचे नियंत्रण असायचे. पोलिसांच्या तपासात हे उघड झाल्यानंतर बँक खाती गोठवली गेली आहेत.