Bosphorus Boxing Tournament | निखतचा उपांत्य फेरीत पराभव

नवी दिल्ली – तुर्कस्तानच्या इस्तांबुलमध्ये झालेल्या बॉस्फोरस मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या निखत झरीनला पराभवाचा धक्का बसला. महिलांच्या 51 किलो वजनी गटात खेळणाऱ्या निखतला उपांत्य फेरीत तुर्कीच्या बुसेनाडने पराभव केला.
त्यामुळे निखतला ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात निखतने दोन वेळा विश्वविजेती कझाकिस्तानच्या कझायबे नाझिमचा 4-1 असा पराभव केला होता. त्याअगोदर तिने गतविजेती रशियाची बॉक्सिंगपटू पल्टेसेवा एक्तेरिनाला 5-0 असे पराभूत केले होते.
पुरुषांमध्ये 57 किलो वजनी गटात खेळणाऱ्या गौरव सोलंकीलाही रजतपदक मिळवण्यात यश आले.
अर्जेंटिनाच्या निर्को कुएलोने गौरवला उपांत्य सामन्यात 5-0 असे हरवत अंतिम फेरीत स्थान मिळवले. या दोघांच्या पराभवामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
याआधी भारताच्या अन्य महिला बॉक्सिंगपटू सोनिया लादर (59 किलो), परवीन (60 किलो) आणि ज्योती (69 किलो) यांना उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. पुरुषांमध्ये 63 किलो वजनी गटात शिव थापाला तुर्कीच्या हाकान डोगानकडून 1-4 असा पराभव पत्करावा लागला.





