अबुजा (नायजेरिया) : नायजेरियाच्या वायव्येकडील भागात मोटर सायकलवरून आलेल्या सशस्त्र हल्लेखोरांनी तब्बल ६० लोकांचे अपहरण केले आहे. यामध्ये महिला आणि मुलांचेही अपहरण करण्यात आले आहे, असे साक्षीदारांनी सांगितले. झामफारा राज्यातील न्यू टाउन डमरी या भागामध्ये यापुर्वी देखील मोठ्या प्रमाणावर सामान्य नागरिकांचे अपहरण करण्यात आले आहे. शनिवारी गावामध्ये मोटर सायकलवरून काही लोक हवेत गोळीबार करत घुसले होते. त्यांनी गावातील महिलांना आणि लहान मुलांना बळजबरीने आपल्याबरोबर नेले. तेंव्हापासून या सर्वांबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. स्थानिक पातळीवर डाकू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गटांनी अलिकडच्या काळात राज्यभरात शेकडो लोकांना ठार मारले आहे आणि हजारो लोकांना बळजबरीने ताब्यात घेतले आहे. ते अनेकदा महिनोनमहिने लोकांना आपल्या ताब्यात ठेवतात आणि त्यांच्या सुटकेसाठी खंडणीची मागणी करतात. महिला आणि मुलांसह ६० हून अधिक लोकांना पळवून नेण्यात आले, असे गावाचे प्रमुख शेहू मुसा यांनी सोमवारी वृत्तसंस्थेला फोनवरून सांगितले. हल्लेखोरांनी जवळच्या रोगोजी गावात एका शेतकऱ्याची हत्या केली आणि त्याच्या मुलाचे अपहरण केले, असे मुसा म्हणाले. नायजरच्या सीमेला लागून असलेले झामफारा हे हिंसक हल्ल्यांचे केंद्र बनले आहे. त्यामुळे शेती आणि प्रवास विस्कळीत झाला आहे आणि हजारो लोकांना त्यांची घरे सोडून पळून जावे लागले आहे.