पिंपरी – रहदारीस अडथळा ठरणारे वाहन पुढे घेण्यास सांगितल्याच्या कारणावरून दोन जणांनी पोलिसांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना निगडीतील त्रिवेणीनगर चौकात सोमवारी (दि. 26) दुपारी घडली.
दीपक शंकर यादव (वय 39, रा. यादव निवास, काकाची कॉर्नर, त्रिवेणीनगर, तळवडे) आणि सतीश सोपान खराडे (वय 32, रा. एक्स्पान्स हौसिंग सोसायटी, स्पाइन रोड, पेठ क्रमांक 6, प्राधिकरण, मोशी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिस हवालदार रामहरी गेणबा तनपुरे (वय 53) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तनपुरे हे निगडी वाहतूक विभागात काम करतात. ते त्रिवेणीनगर चौकातील शरदनगर झोपडपट्टीजवळ वाहतूकीचे नियमन करीत होते. त्यावेळी आरोपींची मोटार रस्त्यात रहदारीला अडथळा ठरेल अशा पद्धतीने उभी केली होती. यामुळे तनपुरे हे मोटार पुढे लावा, असे सांगण्यास गेले असता आरोपींनी त्यांना अरेरावी करीत मोटार बाजूला घेण्यास नकार देत त्यांना शिवीगाळ केली. तनपुरे यांच्या मदतीला दुसरे पोलिस कर्मचारी आवटे हे आले असता आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करीत लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत जखमी केले. तसेच पोलीस करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत आरदवाड करीत आहेत.