Mumbai Airport : राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने पुण्यातील IED तयार करण्याच्या आणि चाचणी घेण्याच्या 2023 च्या प्रकरणातील दोन फरार संशयितांना अटक केली आहे.राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने पुण्यातील IED तयार करण्याच्या आणि चाचणी घेण्याच्या 2023 च्या प्रकरणातील दोन फरार संशयितांना अटक केली आहे. हे दोघेही बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सीरिया (ISIS) च्या स्लीपर मॉड्यूलचे सदस्य आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अब्दुल्ला फैज शेख उर्फ डायपरवाला आणि तल्हा खान अशी आहेत. हे दोघे इंडोनेशियाच्या जकार्ता शहरात लपून बसले होते. भारतात परत येण्याच्या प्रयत्नात ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (टर्मिनल 2) पोहोचले असता, इमिग्रेशन विभागाने त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर NIA च्या पथकाने त्यांना अटक केली. हे दोघे दोन वर्षांपासून फरार होते. NIA विशेष न्यायालय, मुंबईने त्यांच्याविरोधात अजामिनपात्र वॉरंटही जारी केले होते. याशिवाय त्यांच्याविषयी माहिती देणाऱ्यास प्रत्येकी 3 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. ‘RC-05/2023/NIA/MUM’ या गुन्ह्यांतर्गत या दोघांसह आणखी आठ जणांना अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या सर्वांनी मिळून भारत सरकारविरोधात युद्ध छेडून देशातील शांतता व धार्मिक सलोखा बिघडवण्याचा कट रचला होता. ISIS च्या कट्टर अजेंड्यानुसार भारतात इस्लामी राजवट प्रस्थापित करण्यासाठी हिंसाचार आणि दहशतीच्या मार्गाचा अवलंब केला गेला. अब्दुल्ला फैज शेख याने पुण्यातील कोंढवा भागात भाड्याने घेतलेल्या घरातून स्फोटके तयार करण्याची आणि प्रशिक्षण कार्यशाळा घेण्याची योजना राबवली होती. 2022-2023 दरम्यान या ठिकाणी त्यांनी IED बनवून त्याची चाचणीही केली होती. या प्रकरणात NIA ने आधीच सर्व 10 आरोपींविरुद्ध UAPA, स्फोटक पदार्थ कायदा, शस्त्र कायदा आणि भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांखाली आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या इतर आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत: मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी, अब्दुल कादिर पठाण, सिमाब नसीरुद्दीन काझी, झुल्फिकार अली बारोदावाला, शामिल नाचन, अकीफ नाचन आणि शहनवाज आलम.