Nhalewadi Leopard Attack: मदत नको, बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करा! चिमुकल्याच्या मृत्यूनंतर संताप; ग्रामस्थांची जलमंदिर पॅलेसवर धाव
Nhalewadi Leopard Attack: न्हाळेवाडीत २ वर्षांच्या जय खंडागळेचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू; १० लाखांची तातडीची मदत, उर्वरित १५ लाख महिन्याभरात देण्याचे वनविभागाचे आश्वासन.

Nhalewadi Leopard Attack- अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेल्यानंतर न्हाळेवाडी परिसरातील संतापाचा उद्रेक रविवारी फुटला. निष्पाप मुलाचा जीव गेल्यानंतर केवळ आर्थिक मदत नको, तर गावाच्या परिसरात धुमाकूळ घालणार्या बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करा, अशी आक्रमक मागणी करीत मृत बालकाच्या नातेवाईकांसह परिसरातील तीन गावांतील संतप्त ग्रामस्थांनी थेट खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेसवर धाव घेतली.
न्हाळेवाडी येथे शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास जय संदीप खंडागळे हा दोन वर्षांचा चिमुरडा घरासमोर आला असताना परिसरात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर झडप घातली. कुटुंबीयांनी आरडाओरड करीत त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जयचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थ जलमंदिर पॅलेसवर दाखल झाल्याची माहिती मिळताच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस प्रशासनही तेथे पोहोचले.
यावेळी ग्रामस्थांनी अधिकार्यांना धारेवर धरत बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली. पैसे देऊन आमचा मुलगा परत येणार नाही. आता दुसर्या घरातील चिमुरडा बिबट्याच्या तावडीत जाण्यापूर्वी त्याला पकडा, अशी आर्त आणि संतप्त भावना मृत बालकाचे वडील संदीप खंडागळे यांनी व्यक्त केली. दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत वनविभागाच्या अधिकार्यांनी मृत बालकाच्या कुटुंबीयांना तातडीची 10 लाख रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली.
बिबट्याच्या बंदोबस्तासाठी यंत्रणा सक्रिय
न्हाळेवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. बिबट्याला लवकरात लवकर पकडण्याचे आश्वासन वनविभागाने ग्रामस्थांना दिले. दरम्यान, या घटनेनंतर भविष्यात बिबट्यांचा धोका कमी करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने उद्या (सोमवारी) सातारा जिल्हाधिकार्यांच्या उपस्थितीत वनविभागाच्या अधिकार्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत केवळ आश्वासनांवर चर्चा होते की न्हाळेवाडी परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस निर्णय घेतले जातात, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.






