Satara News : बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू; साताऱ्यातील घटनेने हळहळ
Satara News : मुलाला बिबट्याने उचलून नेल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी आरडाओरड केली. आवाज ऐकून गावातील अनेक तरुण घटनास्थळी धावले.

सातारा : घराच्या दारातून बाहेर पडलेल्या अवघ्या दोन वर्षांच्या चिमुरड्याला बिबट्याने उचलून नेल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी (दि. ३) रात्री सातारा तालुक्यातील पुनर्वसित न्हाळेवाडी येथे घडली. ग्रामस्थांनी पाठलाग करून बिबट्याच्या तावडीतून मुलाला सोडविले. मात्र, गंभीर जखमी झालेल्या जय संदीप खंडागळे याचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
शनिवारी सायंकाळी साडेसात ते आठच्या सुमारास न्हाळेवाडी परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. गावावर अंधार पसरलेला असतानाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने वस्तीत प्रवेश केला. जय घराच्या दरवाजातून बाहेर येत असताना बिबट्याने अचानक त्याच्यावर झडप घातली. त्याला तोंडात पकडून ओढ्याच्या आणि ऊसाच्या शेताच्या दिशेने बिबट्या धावत सुटला.
मुलाला बिबट्याने उचलून नेल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी आरडाओरड केली. आवाज ऐकून गावातील अनेक तरुण घटनास्थळी धावले. त्यांनी ओढ्याच्या दिशेने पाठलाग करत मोठा गोंधळ घातल्याने बिबट्याने मुलाला सोडून पळ काढला. गंभीर जखमी अवस्थेतील जयला तातडीने सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गळ्याला तसेच शरीरावर झालेल्या गंभीर जखमांमुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेने न्हाळेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
न्हाळेवाडीत वनविभागाची धावाधाव; बिबट्याच्या हालचालींवर नजर
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी न्हाळेवाडीत दाखल झाले. बिबट्याचा माग काढण्यासाठी परिसराची पाहणी सुरू करण्यात आली असून, त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. गावालगतच्या उसाच्या शेतांसह ओढ्याच्या परिसरात वन विभागाकडून शोधमोहीम राबविण्यात येत आहे. ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना विशेष खबरदारी घ्यावी, तसेच एकट्याने शेताकडे जाऊ नये, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.





