Pune | डीईएस पुणे विद्यापीठात “एआय’चे पुढचे पाऊल

पुणे, – कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित शिक्षणातून होणाऱ्या संशोधनाला मदत करण्यासाठी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस पुणे विद्यापीठ आणि पनवेल स्थित योटा डेटा सर्व्हिसेस यांच्यात सामंजस्य करार झाला. या माध्यमातून विद्यार्थ्यांना “एआय’वर आधारित टूल्स, फ्रेमवर्क्स, डेटासेट्स, “एआय’ मॉडेल शिकता येणार आहेत.
डीईएस पुणे विद्यापीठात मंगळवारी या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत डीईएस पुणे विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य यांनी या कराराची माहिती दिली. यावेळी कुलगुरू डॉ. प्रसाद खांडेकर, योटा संस्थेचे संदीप पाठक, सुनील गुप्ता, विशाल अग्रवाल, मंगेश शिगवण आणि विशाल पाटील आदी उपस्थित होते.
डॉ. आचार्य म्हणाले, जगातील दुसऱ्या क्रमांकाचा असलेल्या डेटा सेंटरसोबत करार करणारे डीईएस पुणे विद्यापीठ हे देशातील पहिलेच खासगी विद्यापीठ आहे. या करारामुळे डीईएसचे विद्यापीठ “एआय’ तंत्रज्ञानाशी एकरूप होतील. “एआय’मध्ये संशोधनासाठी “एआय लॅब’ ही एक अद्वितीय सुविधा असून, वाढत्या डेटा आणि कार्यक्षम प्रक्रियेच्या गरजांनुसार ती डीईएसमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.
“एआय’च्या आगमनासह तंत्रज्ञानाचा वेगाने बदलता नकाशा पाहता, डीईएसने या क्षेत्रातील प्रमुख संस्थांसोबत धोरणात्मक संबंध प्रस्थापित केले आहेत. योटासोबतची भागीदारी विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना व्यावहारिक प्रकल्पांमध्ये भाग घेण्यासाठी आवश्यक अनुभव मिळवून देईल.
– डॉ. प्रसाद खांडेकर, कुलगुरू, डीईएस पुणे विद्यापीठ





